Join us  

भारताला मालिका विजयाची संधी; दुसरी टी-२० लढत आज

वेस्ट इंडिज विरुद्ध आज रविवारी होणारा दुसरा टी-२० सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 2:17 AM

Open in App

त्रिवेंद्रम : वेस्ट इंडिज विरुद्ध आज रविवारी होणारा दुसरा टी-२० सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाला आहे; त्यासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुका सुधारण्याचे आव्हानदेखील असेल.

भारताने मागील १३ महिन्यांत विंडिज विरुद्ध ६ टी-२० सामने जिंकले. विराट कोहलीची नजर सलग सातव्या विजयावर असेल. पहिला सामना भारताने ६ गड्यांनी जिंकून मालिकेत १-० ने आघाडी मिळविली आहे. याआधी बांगलादेशवर २-१ने विजयासह भारताने टी-२० मालिका जिंकली होती.

शुक्रवारी १८.४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावांचे लक्ष्य गाठले. राहुलने त्यात ४० चेंडूत ६२ धावांचे तसेच कर्णधार कोहलीने नाबाद ९४ धावांचे योगदान दिले. जखमी धवनची जागा घेणाऱ्या राहुलने संधीचा लाभ घेतला. टी-२०त वेगवान हजार धावा करणारा तो तिसरा फलंदाज बनला. त्याने २९ डावात ही किमया साधली. खराब फॉर्ममधून जात असलेल्या ऋषभ पंतने दोन षटकार खेचले. फलंदाजांची कामगिरी शानदार होती पण गोलंदाजी ढेपाळली. एविन लुईस, शिरमोन हेटमायर आणि कर्णधार किरोन पोलार्ड यांनी गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली.

द. आफ्रिका आणि बांगला देशविरुद्ध प्रभावी ठरलेला दीपक चाहर याने तब्बल ५४ धावा मोजल्या. भुवनेश्वरने चार षटकांत ३६ धावा दिल्या तर वॉशिंग्टन सुंदर देखील प्रभावी ठरला नव्हता. दुसºया सामन्यात गोलंदाजीत काही बदल होतात की कुलदीपला संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

क्षेत्ररक्षणात सुंदर आणि रोहित शर्मा यांनी काही झेल सोडले. याशिवाय ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे अनावश्यक धावा मोजाव्या लागल्या.दुसरीकडे विंडीज संघ बरोबरी साधण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. पण कोहलीला कसे बाद करायचे हे त्यांच्या गोलंदाजांसाठी कोडे आहे.

उभय संघ यातून निवडणार

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

वेस्ट इंडीज : किरोन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन अ‍ॅलन, ब्रेंडन किंग, दिनेश रामदीन, शेल्डन कॉटरेल, एविन लुईस, शेरफाने रुदरफोर्ड, शिमरोन हेटमायर, केरी पियरे, लेंडिल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनियर, कीमो पॉल आणि केसरिक विलियम्स.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्माभारत