Join us  

IND vs AUS: "तुमच्याकडे 6 फूट 4 इंच उंच गोलंदाज असेल तर सांगा", राहुल द्रविडने पत्रकाराची घेतली फिरकी

rahul dravid press conference: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 2:06 PM

Open in App

Rahul Dravid | नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार खेळीमुळे पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला. 17 तारखेपासून या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तोंडावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी यांची उदाहरणे देत एका पत्रकाराने द्रविड यांना विचारले की, भारताकडे असे दर्जेदार डावखुरे गोलंदाज का नाहीत? असे सांगून पत्रकाराने आशिष नेहरा आणि इरफान पठाण यांची नावेही सांगितली की, टीम इंडियाकडे पूर्वी अशा प्रकारचे चांगले डावखुरे गोलंदाज होते, मात्र आता का नाहीत?. 

राहुल द्रविड यांनी अर्शदीप सिंगचा दाखला देत म्हटले... राहुल द्रविड यांनी पत्रकाराला प्रत्युत्तर देताना म्हटले, "डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज खूप भिन्नता आणतो. तुम्ही झहीर खानचे नाव घ्यायला विसरलात. पण निवडकर्ते आणि व्यवस्थापन अशा कलागुणांवर बारकाईने लक्ष ठेवतात. अर्शदीप सिंगने अलीकडच्या वन डे सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्याने रणजी ट्रॉफी देखील खेळली आहे जिथे त्याने 4-5 बळी घेतले आहेत. तो युवा आणि प्रभावी गोलंदाज आहे. पण फक्त डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने तुम्हाला संघात येण्यास मदत होणार नाही, तुम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे."

द्रविड यांनी पत्रकाराची घेतली फिरकी मात्र, पत्रकाराने राहुल द्रविड यांना मध्येच थांबवले आणि हे गोलंदाज (शाहीन आणि स्टार्क) कधी कधी आपल्या फलंदाजांना कसे भारी पडतात ते सांगितले. यानंतर द्रविड यांनी एक भन्नाट उत्तर देताना म्हटले, "तुमच्याकडे 6 फूट 4 इंचांचा कोणी गोलंदाज असेल तर मला सांगा. तुम्ही मिचेल स्टार्क आणि शाहीन आफ्रिदीची नावे घेतलीत, पण भारताकडे डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा 6 फूट 5 इतका उंच गोलंदाज क्वचितच असेल." ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, श्रेयस अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.  ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

  1. 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
  2. 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
  3. 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, इंदूर 
  4. 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

 ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

  1. 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 
  2. 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
  3. 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराहुल द्रविडपत्रकारभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App