ICC ODI Rankings : श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेत सर्व भारतीय फलंदाज संघर्ष करत असताना कर्णधार रोहित शर्माने एकट्याने किल्ला लढवला. सलग दोनवेळा अर्धशतक झळकावून हिटमॅनने मोर्चा सांभाळला. पण, इतर सहकाऱ्यांची साथ न मिळाल्याने भारताला मालिका गमवावी लागली. श्रीलंकेविरूद्धच्या कामगिरीचा रोहित शर्मालाआयसीसी क्रमवारीत चांगलाच फायदा झाला. त्याने वन डेतील फलंदाजांच्या क्रमवारीत शुबमन गिलला मागे टाकले. रोहित यासह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून, पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझमच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे.
रोहितने दुसरा क्रमांक गाठून कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. श्रीलंकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधाराने सर्वाधिक १५७ धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेकडून शतकी खेळी करणाऱ्या पथुम निसांकाने आठव्या क्रमांकावर झेप घेतली. खरे तर ३७ वर्षीय रोहित शर्मा कसोटी क्रमवारीतही आघाडीवर आहे.
दरम्यान, भारतीय संघाला वन डे मालिकेत पराभूत करून श्रीलंकेने ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी तब्बल २७ वर्षांनंतर बलाढ्य टीम इंडियाला द्विपक्षीय मालिकेत नमवले. १९९७ पासून सुरू असलेला भारताचा श्रीलंकेविरूद्धचा विजयरथ यावेळी मात्र थांबला. भारताविरूद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंनाही आयसीसी क्रमवारीत चांगला फायदा झाला.
आगामी काळात भारतीय संघ मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ट्वेंटी-२० मालिका पार पडेल. ही मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर येईल. मात्र, टीम इंडिया वन डे सामना आता थेट पुढच्या वर्षी खेळेल.
बांगलादेशचा भारत दौरा१९-२४ सप्टेंबर - पहिला कसोटी सामना, चेन्नई२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, कानपूर६ ऑक्टोबर - पहिला ट्वेंटी-२० सामना, ग्वाल्हेर९ ऑक्टोबर - दुसरा ट्वेंटी-२० सामना, दिल्ली १२ ऑक्टोबर - तिसरा ट्वेंटी-२० सामना, हैदराबाद
इंग्लंडचा भारत दौरा २२ जानेवारी - पहिला ट्वेंटी-२० सामना, कोलकाता २५ जानेवारी - दुसरा ट्वेंटी-२० सामना, चेन्नई२८ जानेवारी - तिसरा ट्वेंटी-२० सामना, राजकोट३१ जानेवारी - चौथा ट्वेंटी-२० सामना, पुणे२ फेब्रुवारी - पाचवा ट्वेंटी-२० सामना, मुंबई६ फेब्रुवारी - पहिला वन डे सामना, नागपूर९ फेब्रुवारी - दुसरा वन डे सामना, Cuttack१२ फेब्रुवारी - तिसरा वन डे सामना, अहमदाबाद