नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी सध्या वाईट काळ सुरु आहे, असं काही जण म्हणत आहेत. भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर एकदिवसीय संघात धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आली आणि रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. पण भारताने जरी धोनीला संघातून नाकारलं असलं तरी पाकिस्तानच्या माजी खेळाडूने मात्र धोनीला समर्थन दिले आहे.
धोनीला गेल्या वर्षभरात फलंदाजीमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे धोनीला ट्वेन्टी-20 संघातून वगळण्यात आले, असे म्हटले जात आहे. पण ज्या दिवशी धोनीला संघातून वगळण्यात आले होते. त्यावेळी धोनीने मैदानात सूर मारत झेल पकडला आणि निवड समितीचे दात घशात टाकले होते.
भारतीय निवड समितीने धोनीला ट्वेन्टी-20 संघासाठी नाकारले असले तरी पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांनी धोनीची बाजू घेतली आहे. ते म्हणाले की, " धोनीसारखा खेळाडू भारताला शोधूनही सापडणार नाही. त्याला ट्वेन्टी-20 संघातून वगळण्याचा निर्णय चुकीचा होता. त्याला संघात स्थान द्यायला हवे. पण त्याचबरोबर धोनीने आपले फलंदाजीमध्ये नेमके काय चुकते आहे, याचाही विचार करायला हवा. "