इंदूर : सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता रविवारी इंदूर येथील दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पहिल्या लढतीत अपयशी ठरलेल्या आर. अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्यासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल. तर सूर्या आणि राहुलला फलंदाजीत सातत्य ठेवावे लागेल.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिला सामना सहज जिंकला. मोठ्या धावसंख्येसाठी ओळखल्या जाणाऱ्या होळकर स्टेडियमवर भारतीय संघाचा मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न असेल. पावसामुळे शहरातील तापमान घसरले आहे. त्यामुळे मोहालीत उकाड्याचा सामना करणाऱ्या खेळाडूंना दिलासा मिळणार आहे. पहिल्या लढतीत मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांची कामगिरी भारतासाठी सकारात्मक बाब ठरली; पण ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी काही प्रश्न अनुत्तरितच आहेत.
दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा चौथ्या क्रमांकावरील फलंदाज श्रेयस अय्यर धावा करण्यात अपयशी ठरत आहे. आशिया चषकात पाठ दुखावल्यामुळे तो काही सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. शुक्रवारी पहिल्या सामन्यात तो केवळ आठ चेंडू खेळून धावबाद झाला. श्रेयस पुढील दोन सामन्यांत धावा करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेआधी त्याचे मनोबल उंचावण्यास मदत होईल. सातत्याने अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमारने पहिल्या लढतीत शानदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे सूर्यकुमार आणि संघ व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे.
लाबुशेन, स्मिथ या फलंदाजांवर असेल लक्षभारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचेही प्रमुख खेळाडू पहिल्या वनडेमध्ये खेळू शकले नाहीत. त्यात मिशेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेजलवूड यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मोहालीतील लढतीनंतर सांगितले की, हे तिन्ही खेळाडू राजकोट येथे २७ सप्टेंबरला होणाऱ्या तिसऱ्या सामन्याआधी खेळण्यासाठी सज्ज होतील. सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने फाॅर्ममध्ये सातत्य राखले आहे; पण स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन हेदेखील मोठी खेळी करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. या मैदानावर अखेरचा एकदिवसीय सामना जानेवारीत खेळला गेला होता.
अश्विनकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षाअश्विनने पुनरागमनानंतर प्रभावी गोलंदाजी केली; पण तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्रास देण्यात अपयशी ठरला. सपाट खेळपट्टीवर त्याचा चेंडू वळत नव्हता, त्यामुळे त्याचे चेंडू फलंदाज सहजपणे खेळत होते. अक्षर पटेल दुखापतीतून सावरला नाही तर अश्विन भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जर वाॅशिंग्टनला संधी मिळाली तर अश्विनला बाहेर बसावे लागू शकते.
शार्दूलला राखावे लागेल सातत्यवेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरही कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. त्याने पहिल्या लढतीत १० षटकांत ७८ धावा दिल्या होत्या. त्याच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे.
भारत : के. एल. राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दूल ठाकूर, वाॅशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन इलिस, कॅमेरून ग्रीन, ॲडम झम्पा, मार्कस स्टाॅयनिस, मिशेल स्टार्क, स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वाॅर्नर, जोश हेजलवूड, स्पेंसर जाॅनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शाॅर्ट.