ICC Men's Player Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत पाकिस्तानी खेळांडूचे वर्चस्व वाढलेलं दिसतं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा जवळपास आता तीनही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. वन डे व ट्वेंटी-२० क्रमवारीत बाबत अव्वल स्थानावर आहेच आता तो कसोटी क्रमवारीतही त्या दिशेने आगेकूच करतोय. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट सध्या कसोटी फलंदाजांमध्ये अव्वल आहे आणि २७ वर्षीय बाबरने एक स्थानांची सुधारणा करताना ८७४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कूच केली आहे. कसोटीतील त्याची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे .
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाबरने दमदार कामगिरी केली आहे. या मालिकेत त्याने पहिल्या कसोटीत संघाच्या एकूण ( २१८) धावसंख्येतील जवळपास ५५ टक्के ( ११९) धावा या स्वतः केल्या होत्या. त्याने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की त्याला आयसीसीच्या क्रमवारीत तीनही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनायचे आहे. कसोटी क्रमवारीत बाबरने तिसऱ्या स्थानी झेप घेतली, रिषभ पंत पाचव्या व रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यानेही श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करताना कसोटी गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेताना भारताच्या जसप्रीत बुमराहला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफिकने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मॅच विनिंग खेळी केली होती आणि त्याचा फायदा त्याला झाला. त्याने २३ स्थानांची झेप घेताना ६७१ गुणांसह १६ वे क्रमांक पटकावले. आातपर्यंत पहिल्या सहा कसोटीनंतर सर्वाधिक रेटिंग पॉईंट मिळवणारा अब्दुल्लाह हा तिसराच फलंदाज ठरला. यापूर्वी सुनील गावस्कर ( ६९२) व सर डॉन ब्रॅडमन ( ६८७) यांनी ही किमया केली होती. पाकिस्तानकडून सईज अहमदने सहा कसोटीनंतर ६१४ रेटिंग पॉईंट्स कमावले होते.
श्रीलंकेचा फलंदाज दिनेश चंडीमल यानेही पहिल्या कसोटीत ७६ व ९४* अशी खेळी केली होती आणि त्यामुळे तो ११ स्थानांच्या सुधारणेसह १८व्या क्रमांकावर पोहोचला. फिरकीपटू प्रभात जयसूर्याने ११ स्थान वर झेप घेऊन ४४ वा क्रमांक पटकावला. दोन कसोटींनंतर सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स कमावणारा प्रभात ( ४८१) चौथा गोलंदाज ठरला. यापूर्वी नरेंद्र हिरवानी ( ५१९), अॅलेक बेडसर ( ५००) व बॉब मॅसी ( ४९४ ) यांनी ही कामगिरी केली आहे. ट्वेंटी-२० क्रमवारीत फार काही बदल झालेला नाही. वन डे क्रमवारीत क्विंटन डीकॉक चौथ्या स्थानी सरकल्याने विराट कोहली व रोहित शर्मा यांची अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत. बाबर अव्वल स्थानावर कायम आहे.
Web Title: India duo Virat Kohli (fifth) and Rohit Sharma (sixth) each drop in ODI Ranking, Pakistan star player's domination in the ICC Men's Player Rankings continues
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.