T20 World Cup 2021: आयसीसीच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना आज दुबईच्या स्टेडियमवर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्डकप विजयासाठी आज लढत होईल. भारतीय संघ मात्र यावेळी उपांत्य फेरीपर्यंत देखील पोहोचू शकला नाही. भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला असता आणि उपांत्य फेरी देखील जिंकली असती म्हणजे भारताचे दोन आणखी सामने झाले असते. भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात येताच ब्रॉडकास्टर्सना मोठं नुकसान झालं आहे.
सुपर-१२ मध्येच भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानं ब्रॉडकास्ट स्टार इंडिया नेटवर्कला जवळपास २०० कोटींचं जाहिरातीच्या मिळकतीचं नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचा आज अंतिम सामनास्टार स्पोर्ट्स नेटवर्कनं यूएईमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत टेलिव्हिजन जाहिरातीच्या प्रसारणातून जवळपास ९०० ते १२०० कोटींच्या कमाईचा अंदाज व्यक्त केला होता. इंडस्ट्रीतील सुत्रांच्या माहितीनुसार स्टार नेटवर्कच्या OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar नं जवळपास २५० कोटींची कमाईचा अंदाज व्यक्त केला आहे. माध्यमातील दिग्गज मदन महापात्रा यांच्या अंदाजानुसार या स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर पडल्यानं स्टार नेटवर्कला जवळपास १५ ते २० टक्के नुकसान होणार आहे. जर उपांत्य आणि अंतिम फेरीत भारतीय संघ दाखल झाला असता तर प्रेक्षकसंख्या देखील वाढली असती. सहसा ब्रॉडकास्टर्स क्रिकेट स्पर्धेसाठी ८० ते ८५ टक्के जाहिरातीचे स्लॉट आधीच बुकिंग करुन ठेवतात. तर उर्वरित बुकिंग स्पर्धेतील परिस्थितीनुसार केलं जातं. जेणेकरुन स्पर्धेतील रोमांचक परिस्थितीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त कमाई करता येते. पण यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीआधीच स्पर्धेबाहेर झाल्यानं स्टार नेटवर्कच्या हातचा जॅकपॉट हिरावला गेला आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तान सामन्यात मात्र नेटवर्कनं बक्कळ कमाई केली आहे. या सामन्यात ब्रॉडकास्टर्नं १० सेकंदाच्या एका जाहिरातीसाठी तब्बल २५ लाख रुपयांची कमाई केली. त्यात जर भारत-पाकिस्तान अशी अंतिम फेरीत लढत झाली असती हाच जर ३५ लाखांपर्यंत पोहोचला असता. भारतीय संघ स्पर्धेबाहेर गेल्यानं याआधीच दर्शक संख्येत ४० ते ४५ टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेत अखेरपर्यंत टिकून राहणं ब्रॉडकास्टर्ससाठी देखील खूप फायदेशीर असतं.