वॉशिंग्टन : भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषकात सलग दोन विजयासह विजयी वाटेवर स्वार झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना पावसात वाहून गेला, पण भारतीय चाहत्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहात आहे. अनेकांनी भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरविले आहे. आता जगप्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी भाकीत केले आहे.
पिचई यांच्यामते विश्वचषक अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाईल. विराटच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकावा, अशी पिचई यांची इच्छा आहे. मी क्रिकेटचा मोठा चाहता असून अमेरिकेत आलो त्यावेळी बेसबॉलही आवडायला लागल्याचे पिचई यांनी सांगितले. ‘आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे संघही तुल्यबळ आहेत. हे चारही संघ अत्यंत प्रतिभावान आहेत. मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होईल, असा अंदाज आहे,’ असे पिचई यांनी म्हटले. त्यांनी क्रिकेट व बेसबॉलचे अनुभवही सांगितले. ते म्हणाले, ‘मी अमेरिकेत बेसबॉल खेळण्याचा खूप प्रयत्न केला. पहिल्यांदा बेसबॉल खेळलो, तेव्हा मागच्या दिशेने एक चेंडू टोलवला. क्रिकेटमध्ये त्या शॉटला खूप महत्त्व असते. क्रिकेटमध्ये धावताना हातात बॅट असते. त्याचप्रमाणे मीही बेसबॉल खेळताना बेसवरून धावलो.हा खेळ दिसतो तितका सोपा नाही.’