सौरव गांगुली लिहितात...
ट्रेंटब्रिज कसोटी जिंकून भारताने धडाकेबाज आणि यशस्वी पुनरागमन केल्यानंतर पाच सामन्यांची कसोटी मालिका आता रोमहर्षक बनली आहे. आव्हानांचे दडपण आता इंग्लंडवर आले. भारत इतक्या जोरदार मुसंडी मारेल, याची कल्पना रुट अॅन्ड कंपनीलाही नसावी. पण भारताने बाजी फिरविल्यामुळे मालिकेचा शेवट नाट्यमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सलामीवीरांनी विजयाचा पाया रचला. शंभरावर धावांची भागीदारी झाली असेल पण नव्या चेंडूला समर्थपणे तोंड दिल्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना चाप बसला. भारताने नाणेफेक गमावली शिवाय इंग्लंडने विराटच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले, हे भारताच्या पथ्यावरच पडले असे म्हणावे लागेल. ज्योरुटने या मालिकेत नाणेफेक जिंकूनही प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, हे माझ्यामते कसोटीसाठी चांगले लक्षण नाही. भारताची ताकद असलेली फलंदाजी अखेर तळपलीच. धवन, राहुल, पुजारा आणि रहाणे यांनी संयमी खेळीचा परिचय दिला.
भारताच्या प्रत्येक फलंदाजाच्या धावा प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या चिंतेत भर पाडणाºया ठरल्या असाव्यात यात शंका नाही. ट्रेंटब्रिजची खेळपट्टी अॅन्डरसन आणि ब्रॉड यांच्यासाठी नंदनवन ठरेल, असे समजले जात होते, पण घडले उलटेच. बुमराह, पांड्या आणि ईशांत यांच्या वेगवान माºयाची येथे ‘बल्ले- बल्ले’ झाली. बुमराहसह सर्वच गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि लय राखून मारा केला.बुमराहची यजमान फलंदाजांनी धास्तीच घेतली आहे. चौथी कसोटी फलंदाजविरुद्ध गोलंदाज अशी लढाई ठरेलच पण त्याहून अधिक म्हणजे हे मानसिक युद्ध ठरणार आहे. भारतीय संघ मालिका गमविण्याच्या स्थितीत असताना तिसरा सामना जिंकून मानसिकदृष्ट्या वरचढ बनला. यामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. आम्ही एकदा हे करू शकलो तर वारंवार करू शकतो, या वृत्तीचा टीम इंडियात संचार झाला. इंग्लंडचा हा संघ पराभूत होऊ शकतो, यावरही खेळाडूंचा विश्वास बसला. अश्विन फिटनसेमध्ये यशस्वी झाल्यास भारतीय संघात कुठले बदल होतील, असे मला तरी वाटत नाही. पण इंग्लंडला विचार करणे भाग पडले आहे. भारतीय माºयापुढे त्यांच्या मधल्या फळीला खिंडार पडले.रुट तिसºया स्थानावर खेळतो. तो लवकर बाद होताच इंग्लंडची फलंदाजी दडपणात येते. अशावेळी जेनिंग्सला विश्रांती देत विन्सला खेळविण्याचा यजमानांचा विचार दिसतो. पोप आणि बेयरेस्टो यांनाही वरच्या स्थानावर पाठविले जाऊ शकते. मोईन अलीचा सध्याचा फॉर्म बघता त्यालाही फलंदाजीत बढती मिळू शकेल. (गेमप्लान)