India, Pakistan, IND vs WI ODI Series: सूर्यकुमार यादवने केलेली अर्धशतकी खेळी आणि प्रसिध कृष्णाचे १२ धावांमध्ये ४ बळी याच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत केले. भारतीय संघाने मायदेशात वेस्ट इंडिजला सलग दुसऱ्या वन डे सामन्यात ४४ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. नवा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिलीच वन डे मालिका जिंकली. या मालिकाविजयाबरोबरच भारताने पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर सलग सातव्यांदा आणि एकूण अकराव्यांदा पराभूत करत मालिका जिंकली. ही मालिका जिंकण्यासोबतच टीम इंडियाने द्विपक्षीय मालिकेत (Bilateral Series) सर्वाधिक ११ वेळा वन डे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. त्यासोबतच भारताने विश्वविक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी हा विक्रम केवळ पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावे होता. त्यांनी झिम्बाब्वेला सलग ११ मालिकांमध्ये पराभूत केले होते. पण आता भारताने पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.
मालिका जिंकणं खूप आनंददायी!
"मालिका जिंकणं ही नक्कीच आनंदाची बाब आहे. आम्ही जेव्हा फलंदाजीस उतरलो तेव्हा सामन्यात आव्हानात्मक परिस्थिती होती. सूर्यकुमार आणि लोकेश राहुल यांच्यातील भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची ठरली. जेव्हा तुमचे अनुभवी फलंदाजी चांगली कामगिरी करतात तेव्हा तुम्हाला सामन्याचा निकाल सकारात्मकच मिळतो", असं रोहित मालिका विजयाबाबत बोलला.