Join us

T20 World Cup, Team India : काही खेळाडू देशापेक्षा IPL खेळायला प्राधान्य देतात; संतापलेल्या कपिल देव यांचा रोख नेमका कोणाकडे?

भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याआधीच संपुष्टात आले. आज नामिबियाविरुद्ध औपचारिक लढतीत टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:03 IST

Open in App

भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याआधीच संपुष्टात आले. आज नामिबियाविरुद्ध औपचारिक लढतीत टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. जेतेपदाचे प्रबळ दावेदार अशी हवा केल्यानंतर भारतीय चाहत्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला आपटले आणि त्यानंतर उठून उभं राहण्यासाठी त्यांना न्यूझीलंडच्या धक्क्याची वाट पाहावी लागली. भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर जोरदार टीका केली. त्यांनी बीसीसीआयकडे भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी  वेळापत्रक तयार केला, काही खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत असल्याचेही ते म्हणाले. 

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यानंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळायला हवा होता, असेही कपिल देव म्हणाले. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानंही बायो बबलमुळे आलेल्या थकव्यावर मत व्यक्त केलं. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही अतिरिक्त कार्यभारामुळे खेळाडू दमल्याचे मान्य केले. ''जेव्हा खेळाडूच राष्ट्रीय कर्तव्य सोडून आयपीएलमध्ये खेळण्यास प्राधान्य देतात, तेव्हा आपण काहीच बोलू शकत नाही. देशाकडून खेळण्याची संधी मिळाल्याचा खेळाडूंनी अभिमान बाळगायला हवा. मला त्यांची आर्थिक परिस्थिती माहीत नाही, त्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही, ''असे कपिल देव यांनी ABP News कडे बोलताना मत व्यक्त केलं.

ते पुढे म्हणाले,''मला असे वाटते की पहिलं देशाला महत्त्व दिले पाहिजे आणि नंतर फ्रँचायझींना. आयपीएलमध्ये खेळू नका, असे माझे म्हणणे नाही, परंतु आता भारतीय क्रिकेटच्या भलाईच्या दृष्टीनं बीसीसीआयनं नियोजन करायला हवं.   झालेल्या चुकांतून शिकायला हवं. आता भविष्याचा विचार करायला हवा आणि त्यानुसार योग्य नियोजन व्हायला हवं. वर्ल्ड कप संपला म्हणजे भारतीय क्रिकेटही संपले, असं नाही. आयपीएल व वर्ल्ड कप यांच्यात पुरेसा कालावधी असायला हवा होता .'' 

टॅग्स :कपिल देवट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयपीएल २०२१
Open in App