India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या ४ सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा एक खेळाडू खेळत आहे, ज्याने नुकतेच आपल्या वडिलांना गमावले आहे. भारतीय क्रिकेट चाहते सोशल मीडियाद्वारे या खेळाडूला सलाम करत आहेत. दिल्ली कसोटीनंतर हा खेळाडू मालिकेतून माघार घेईल, असी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याने या परिस्थितीत देखील देशासाठी खेळण्याचा निर्णय घेतला.
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचे वडील टिळक यादव यांचे बुधवारी (२२ फेब्रुवारी) निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दिल्ली कसोटीनंतर उमेश यादवने ब्रेक घेतला होता. मात्र इंदूरमध्ये म्हणजेच तिसऱ्या कसोटीआधी को पुन्हा संघात परतला. उमेश यादवला या मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात प्लेइंग XIमध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र तिसऱ्या कसोटीच मोहम्मद शामीच्या जागी उमेश यादवला प्लेइंग XIमध्ये संधी मिळाली.
तिसऱ्या कसोटी सामन्याआधी उमेश यादवने टीम इंडियासाठी ५४ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १६५ विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याने भारतासाठी ७५ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामनेही खेळले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यापूर्वी उमेशने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता ज्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. उमेश यादव हा कसोटी फॉरमॅटमधील टीम इंडियाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे.
दरम्यान, टीम इंडियाने २०२१ साली ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र मोहम्मद सिराजने भारतात परतण्याऐवजी टीम इंडियाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मोहम्मद सिराज या मालिकेत टीम इंडियाचा सर्वात मोठा हिरो ठरला होता.
दरम्यान, दोन सामन्यात पराभव स्वीकारलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केला. इंदूर येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. मॅथ्यू कुन्हेमनच्या ५ विकेट्स आणि नॅथन लायनच्या ३ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. भारताकडून कोणताही फलंदाज तिशीही पार करू शकला नाही. रोहित शर्मापासून ते विराट कोहलीपर्यंत दिग्गज फलंदाज केवळ हजेरी लावून गेले. उमेश यादवने थोडीशी फटकेबाजी करून संघाला शंभरी पार करून दिली. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फारशी मोकळी मिळू दिली नाही.