मुंबई : भारतीय संघाने रविवारी न्यूझीलंडवर विजय मिळवून पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1ने खिशात घातली. 2009 नंतर भारतीय संघाने येथे प्रथमच वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह आजी-माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचे कौतुक केले. महान फलंदाज तेंडुलकरने तर भारताचा हा संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याची घोषणाच करून टाकली. पण, त्याचवेळी तेंडुलकरने भारतीय संघाला संभाव्य धोक्याचीही जाणीव करून दिली. जेतेपदाच्या शर्यतीत भारताला एका संघाकडून कडवे आव्हान मिळू शकते, असे तेंडुलकरने सांगितले.भारतीय संघाने 2018 साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजयांची नोंद केली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका ( 5-1), ऑस्ट्रेलिया ( 2-1) आणि न्यूझीलंड ( 4-1) यांच्यावर दणदणीत विजय मिळवला, तर इंग्लंडकडून ( 2-1) त्यांना पराभव पत्करावा लागला. गत वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने वन डे क्रिकेटमध्ये 67.09च्या सरासरीने 54 सामने जिंकले आहेत. मात्र, आयसीसी वन डे क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडची विजयाची सरासरी ही 66.23 इतकी आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जानेवारी 2017 ते आतापर्यंत 46 पैकी 33 सामने जिंकले आहेत. ''विक्रमांची आकडेवारी पाहता भारतीय संघ हा संतुलित आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेत तो जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मग तो वर्ल्ड कप कोठेही झाला तरी. त्यामुळे भारतीय संघच वर्ल्ड कप उंचावेल, याबद्दल मनात तीळमात्र शंका नाही,'' असे तेंडुलकरने वृत्तसंस्थेला सांगितले. पण, त्याच वेळी त्याने इंग्लंडकडून विराट सेनेला जपून राहावे लागेल, असेही सांगितले. तो म्हणाला,''वन डे फॉरमॅटमध्ये इंग्लंडचा संघ मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध खेळताना मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा उचलणे, हे आपल्या हातात आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघासमोर कडवे आव्हान उभे करण्याची ताकद इंग्लंडच्या संघाकडे आहे. न्यूझीलंडचा संघ हा डार्क हॉर्स असेल.''स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या आगमनानंतर ऑस्ट्रेलियाचा संघही जोरदार मुसंडी मारू शकतो, असा विश्वास तेंडुलकरने व्यक्त केला.'' ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा जोरदार कमबॅक करेल. स्मिथ आणि वॉर्नर यांच्या पुनरागमनानंतर संघातील जोश आणखी वाढेल आणि हा संघ जेतेपदाच्या शर्यततीतही परतेल,''असे तेंडुलकरने सांगितले.