कोलंबो - एकतर्फी झालेल्या लढतीत बांगलादेशवर 17 धावांनी मात करत भारतीय संघाने श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेची अंतिम फेरीत प्रवेश केला. रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी केलेली दमदार फलंदाजी आणि वॉशिंग्टन सुंदरची भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. पहिल्या सामन्यात अनपेक्षितरित्या पराभूत झालेल्या भारतीय संघाने पुढच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या दमदार 89 धावा आणि सुरेश रैनाच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेत भारताला बांगलादेशपुढे 177 धावांचे आव्हान ठेवता आले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी 9.5 षटकांत 70 धावांची सलामी दिली. भारताची सुरुवात संथ गतीने झाली होती. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र रोहित आणि धवन या दोघांनीही बांगलादेशच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. रुबेल होसेनने धवनला त्रिफळाचीत करत भारताला पहिला धक्का दिला. धवनने 27 चेंडूंत 5 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 35 धावा केल्या. धवन बाद झाल्यावर रैना फलंदाजीला आला आणि त्याने आपल्या शैलीत सुरुवातीपासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली. रोहित अर्धशतक झळकावण्यापर्यंत संयतपणे फलंदाजी करत होता. 42 चेंडूंमध्ये रोहितने ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील तेरावे अर्धशतक पूणे केले. अर्धशतक पूर्ण केल्यावर मात्र रोहितने आक्रमक फलंदाजी केली. 13 व्या षटकात भारताची 1 बाद 93 अशी स्थिती होती. त्यावेळी भारत आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकेल का, याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. पण त्यानंतर रैना आणि रोहित या दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण चढवले. अबु हैदरच्या 18व्या षटकात या दोघांनी मिळून तीन षटकारांसह 21 धावांची लूट केली. रैनाने 30 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 47 धावांची दमदार खेळी साकारली. रोहितने 61 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 89 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- बांगलादेशवर 17 धावांनी मात करत भारत तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये
बांगलादेशवर 17 धावांनी मात करत भारत तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये
एकतर्फी झालेल्या लढतीत बांगलादेशवर 17 धावांनी मात करत भारतीय संघाने श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेची अंतिम फेरीत प्रवेश केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 10:26 PM