भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये हार पत्करावी लागल्यानंतर ICC ने आज दणका दिला आहे. ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी ही कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची मानाची गदा स्वतःकडे ठेवली. विजयासाठीच्या ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव २३४ धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला. वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अशा आयसीसीच्या चारही स्पर्धा जिंकणारा तो पहिला संघ ठरला. पण, या सामन्यानंतर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. षटकांची गती संथ राखल्याप्रकरणी आयसीसीने भारतीय संघाची १०० टक्के मॅच फी, तर ऑस्ट्रेलियाची ८० टक्के मॅच फी कापली आहे.
भारतीय संघाने निर्धारित वेळेपेक्षा ५ षटकं कमी टाकले, तर ऑस्ट्रेलियाने ४ षटकं कमी टाकले. आयसीसीच्या नियम क्रमांक २.२२ नुसार प्रत्येक षटकाला २० टक्के मॅच फी ही कापली जाते. त्यानुसार भारतीय संघाची संपूर्ण १०० टक्के मॅच फी कापली गेली आहे. याचा अर्थ भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांना WTC Final चा एक रुपयाही नाही मिळणार. शिवाय भारताचा सलामीवीर शुबमन गिल याच्यावरही कारवाई केली गेली आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी गिलच्या विकेटने वादाला फोडणी दिली होती.
कॅमेरून ग्रीनने घेतलेला झेल अनफेअर असल्याचा आरोप चाहत्यांनी केला होता. त्यानंतर गिलनेही सोशल मीडियावरून त्यावर नाराजी व्यक्त केली होती. अम्पायरच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केल्याप्रकरणी गिलला मॅच फीची १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. एकूण गिलला ११५ टक्के मॅच फीची रक्कम द्यावी लागणार आहे.