चटगाव : सलामीवीर झाकिर हसनने कसोटी पदार्पणात शतक झळकाविले, त्याचवेळी अक्षर पटेलच्या मार्गदर्शनात फिरकीपटूंनी मुसंडी मारल्यामुळे बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत शनिवारी भारतीय संघ विजयाच्या दारात पोहोचला आहे. ५१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर ६ गडी गमावून २७२ धावा केल्या. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी २४१ धावांची गरज आहे. दुसरीकडे टीम इंडियाला चार बळी घ्यावे लागतील.
खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन ४० आणि मेहदी हसन मिराज ९ धावांवर खेळत आहेत. फलंदाजी करू शकणारी बांगलादेशची ही शेवटची जोडी आहे. यानंतर गोलंदाज शिल्लक आहेत. अशा स्थितीत बांगलादेशच्या विजयाची शक्यता खूपच कमी आहे. ही जोडी फोडणे लवकर शक्य झाल्यास टीम इंडिया हा सामना सहज जिंकू शकेल.
भारताकडून अक्षर पटेलने तीन बळी घेतले. उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बांगलादेशकडून झाकिर हसनने शतक, तर नजमुल हसनने ६७ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ४०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ १५० धावा करू शकला. भारताकडून कुलदीप यादवने पाच आणि मोहम्मद सिराजने तीन बळी घेतले. शुभमन गिलच्या ११० आणि चेतेश्वर पुजाराच्या १०२ धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात २ बाद २५८ धावा केल्या. पुजाराच्या शतकासह कर्णधाराने डाव घोषित केला.
भारत पहिला डाव : १३३.५ षटकात सर्वबाद ४०४. बांगलादेश पहिला डाव : ५६.५ षटकात सर्वबाद १५० भारत दुसरा डाव : ६१.४ षटकात २ बाद २५८ घोषित. बांगलादेश दुसरा डाव : नजमुल हुसैन शंटो झे, पंत गो. उमेश यादव ६७, झाकिर हसन झे. कोहली गो. अश्विन १००, यासिर अली त्रि. गो. पटेल ५, लिटन दास झे. उमेश यादव गो. कुलदीप यादव १९, मुश्फिकूर रहीम त्रि.गो. पटेल २३, शाकिब अल हसन खेळत आहे ४०, नुरूल हसन यष्टिचित गो. पटेल ३, मेहदी हसन मिराज खेळत आहे ९, अवांतर : ६ एकूण : १०२ षटकात ६ बाद २७२ धावा. गोलंदाजी : उमेश यादव १/२७, रविचंद्रन अश्विन १/७५, अक्षर पटेल ३/५०, कुलदीप यादव १/६९.
Web Title: India four steps away from victory; Akshar's miracle hit after Zakir's century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.