मोंग कोक (हाँगकाँग) : भारताच्या २३ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने अभिमानास्पद कामगिरी करताना इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. झुंजार खेळाचे प्रदर्शन केलेल्या भारतीयांनी अंतिम सामन्यात बांगलादेशचे आव्हान ३१ धावांनी परतावले. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १२७ धावांची मजल मारल्यानंतर भारताने बांगलादेशचा डाव १९.२ षटकांत केवळ ९६ धावांत गुंडाळला.
अंतिम सामन्यात निर्णायक अष्टपैलू खेळ केलेल्या कनिका अहुजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तिने प्रथम फलंदाजीत मोक्याच्यावेळी २३ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर बांगलादेशने आश्वासक सुरुवात केली. परंतु, दुसऱ्या षटकात मन्नत कश्यपने सलामीवीर दिलारा अक्तरला बाद केले आणि यानंतर बांगलादेशच्या फलंदाजीला गळती लागली. मन्नतने २० धावांत ३, तर श्रेयांका पाटीलने केवळ १३ धावांत ४ बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. बांगलादेशकडून नाहिदा अक्तर (१७), शोभना मोस्तरी (१६) आणि शाथी रानी (१३) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.
त्याआधी, चांगल्या सुरुवातीनंतर भारतीयांचा डाव गडगडला. कनिकासह वृंदा दिनेश आणि उमा छेत्री यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताला समाधानकारक मजल मारता आली. वृंदाने २९ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ३६, तर उमाने २० चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह २२ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून नाहिदा अक्तर आणि सुलताना खातून यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
श्रेयांका पाटील सर्वोत्तम खेळाडू
संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ केवळ दोन सामने खेळला. पहिल्या सामन्यात यजमान हाँगकाँगचा धुव्वा उडवल्यानंतर भारताचे पुढील तीन सामने पावसामुळे रद्द झाले. यामध्ये उपांत्य सामन्याचाही समावेश होता. हाँगकाँगविरुद्ध ५ बळी घेतलेल्या श्रेयांकाने अंतिम फेरीतही ४ बळी घेत भारतासाठी मोलाची कामगिरी केली. स्पर्धेत तिने केवळ दोन सामने खेळत सर्वाधिक ९ बळी घेण्याचा पराक्रम केला. या जोरावरच तिची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ७ बाद १२७ धावा (वृंदा दिनेश ३६, कनिका अहुजा नाबाद ३०, उमा छेत्री २२; नाहिदा अक्तर २/१३, सुलताना खातून २/३०.) वि. वि. बांगलादेश : १९.२ षटकांत सर्वबाद ९६ धावा (नाहिदा अक्तर १७, शोभना मोस्तरी १६, शाथी रानी १३; श्रेयांका पाटील ४/१३, मन्नत कश्यप ३/२०.)
Web Title: India Girls Asian, 'Champions' Emerging Asia Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.