तीन युवा खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील कामगिरीने भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांना प्रभावीत केले आहे. हे खेळाडू यंदाच्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भारताच्या वन डे संघात रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल यांच्यात आघाडीच्या फळीत चर्चा आहे. पण, युवा फलंदाजांची आणखी एक फौज ५० षटकांच्या फॉरमॅटसाठी तयार आहे आणि प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीत या युवा खेळाडूंकडे संघात स्थान पटकावण्याची क्षमता व कौशल्य असल्याचे शास्त्रींना वाटते.
युवा डावखुरा यशस्वी जैस्वाल हा आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्ससाठी एकूण ५७५ धावा करत उत्कृष्ट ठरला आहे, तर कोलकाता नाइट रायडर्सच्या रिंकू सिंगनेही गुजरात टायटन्सविरुद्ध अंतिम षटकात केलेल्या फटकेबाजीने शास्त्रींचे लक्ष वेधून घेतले आहे. जैस्वाल आणि रिंकू हे दोघेही भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत, असे शास्त्री यांनी आयसीसी रिव्ह्यूच्या ताज्या भागावर बोलताना सांगितले.
"यशस्वी जैस्वाल याने यंदा प्रभावित केले आहे. गेल्या वर्षीच्यु तुलनेत त्याच्यात लक्षणीय सुधारणा आहे, जी एक अतिशय सकारात्मक बाब आहे. ज्या सामर्थ्याने तो फटकेबाजी करतोय, ते उल्लेखनीय आहे. दुसरा खेळाडू म्हणजे रिंकू सिंग. मी त्याच्याबद्दल जितकं जाणतो, त्याचा स्वभाव विलक्षण आहे. तो नखांसारखा कठीण आहे. हे दोन्ही खेळाडू प्रचंड मेहनत करून येथे आले आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत आणि त्यांच्यासाठी काहीही सोपे नाही. त्यामुळे तुम्हाला ती भूक, ती आवड, ती जिद्द दिसून येईल जी त्यांना शीर्षस्थानी आणण्यासाठी आवश्यक आहे,''असे शास्त्री म्हणाले.
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
'बुडता' पंजाब! PBKS चा पराभव RCBसाठी आशादायक, पण मुंबईचं टेन्शन वाढलं
"युवा खेळाडूूंना खूप पैसा मिळाल्यावर ते भरकटू शकतात", राहुलने सांगितला अनुभव
IPLमध्ये पृथ्वी शॉची आक्रमक खेळी अन् 'ती'ची इन्स्टाग्राम
"फलंदाजीचा विचार केला तर तिलक वर्मा आणि जितेश शर्मा देखील आहेत. जे एक यष्टिरक्षक-फलंदाज आहेत आणि जे खूपच धोकादायक आहेत. साई सुदर्शनने देखील लक्ष वेधले आहे. पण, मी तिलक वर्माला मी भारतीय संघात ठेवेन, मी जैस्वालला ठेवेन, मी रिंकू सिंगला ठेवणार आहे. हे असे उमेदवार आहेत जे ऋतुराज गायकवाड यांच्यासोबत खरोखरच पुढे जाऊ शकतात. वर्ल्ड कप स्पर्धेत जर कोणत्याही प्रमुख खेळाडूला दुखापत झाली, तर ही मुले थेट संघात येऊ शकतात,''असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला.