मुंबई - 2021 साली होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 सालच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे. 2019 सालचा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतानं यापूर्वी चार वेळा वन-डे विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं आहे. 1987, 1996 आणि 2011 मध्ये भारतात वनडे विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2011 साली खेळविण्यात आलेला विश्वचषक भारतानं पटकावला होता. दरम्यान, 2015 साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं होतं.
चौथी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा – १९८७१९८७ ची चौथी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयुक्तरीत्या यजमानपद होते. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने आयोजित केली होती. तर रिलायन्सने स्पॉन्सर्स केली होती. ही स्पर्धा८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान म्हणजे जवळजवळ महिनाभर खेळवण्यात आली. या क्रिकेट विश्वचषकाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ही स्पर्धा प्रथमच इंग्लंडबाहेर घेण्यात आली. तसेच या स्पर्धेत क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले. ही स्पर्धाही पहिल्या स्पर्धेप्रमाणे ६० षटकांची खेळवण्यात आली. या विश्वचषकातील अंतिम सामना कोलकाताच्या ईडन ग्रार्डनवर रंगला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन मात्तबर संघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा अवघ्या ७ धावांनी परभाव केला आणि चौथ्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. तत्पूर्वी गतविजेता भारत आणि पाकिस्तान हे दोन दावेदार संघ मात्र अंतिम फेरीत पोहोचण्यास अपात्र ठरले. हे दोन्ही संघांनी उपांत्यफेरीत धडक मारली होती, तसेच दोन विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघही या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला होता.
सहावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा -१९९६क्रिकेटपटू सहावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात मोठ्या दिमाखात पार पडली. या स्पर्धेत श्रीलंकेने पहिल्या पंधरा षटकांमध्ये धावा कुटण्याची नवी रणनीती आखली आणि त्यात श्रीलंका यशस्वी ठरली. यात क्रिकेटपटू जयसूर्या याने केलेली अप्रतिम फलंदाजी आणि एकूणच श्रीलंकेचा आक्रमक खेळ यामुळे १९९६च्या क्रिकेट विश्वचषकावर श्रीलंकेने आपले नाव कोरले. या स्पर्धेत ९ ऐवजी १२ संघांना स्थान देण्यात आले होते. ही स्पर्धा विल्स कंपनीने स्पॉन्सर्स केली होती. या स्पर्धेच भारत आणि पाकिस्तानकडे दुसऱ्यांदा तर श्रीलंकेकडे पहिल्यांदाच यजमानपद होते. पहिल्या सामन्यापासून फॉर्मात असलेल्या श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानच्या लाहोर येथील गडाफी मैदानावर ऑस्ट्रेलियाला धूळ चारत विश्वचषक जिंकला. श्रीलंकेने प्रथमच क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. या स्पर्धेत पांढरा चेंडू, रंगीत कपडे, ब्लॅक स्क्रीनचा वापर आणि डे-नाईट सामने असे नवनवीन प्रयोग करण्यात आले.
दहावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - 2011दहावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली ती धोनी ब्रिगेडने. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने या विश्वचषकावर नाव कोरले आणि मास्टरबास्टर सचिन तेंडुलकरसह तमाम क्रिकेटप्रेमींची स्वप्नपूर्ती झाली. ही स्पर्धा भारत, श्रीलंका आणि बांगलादेशात खेळवली गेली. यजमान म्हणून बांगलादेशचा प्रथमच समावेश करण्यात आला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेला ६ विकेट्सनी पराभवाचे खडे चारत विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यजमान संघाने विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला. तसेच जबदस्त फॉर्मात असलेल्या युवराज सिंगला मालिकावीराचा मान देण्यात आला. तर दोन आशियायी संघांनी अंतिम सामन्यात धडक मारणे ही क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या स्पर्धेतील क्रिकेटचे सामने आंतरराष्ट्रीय वनडेच्या धर्तीवर खेळवण्यात आले. प्रत्येक सामना ५० षटकांचा होता. १४ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत १० सभासद संघ तर चार असोसिएट संघ होते.