व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचे पहिले तीन दिवस शानदार ठरले, पण भारतीय संघाने स्वत:ला अशा स्थितीत आणून सोडले आहे की, त्यांना आगामी दोन दिवस असाधारण कामगिरी करावी लागेल. खेळपट्टीचे स्वरुप बघून जर चार वेगवान गोलंदाजांना खेळविले तर त्यांच्याकडून सांघिक कामगिरीची अपेक्षा असते. अनुभवी भारतीय वेगवान मारा या खेळपट्टीवर चमकदार कामगिरी करेल, अशी मला आशा होती. उमेश यादवची कामगिरी बघता मी निराश झालो. त्याला दोन्ही डावात आपली सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. भारताने आॅस्ट्रेलियाला पहिल्या डावात ६०-७० धावा अधिक करण्याची संधी दिली. माझ्या मते २५० धावा बरोबर होत्या, पण आॅस्ट्रेलियाने ३२६ पर्यंत मजल मारली. फलंदाजीसाठी खडतर होत असलेल्या खेळपट्टीवर आता संघर्ष करावा लागेल.
भारताला विजय शक्य करण्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या स्कोअरसमीप पोहचण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. भारताने सलामीची जोडी स्वस्तात गमावली. मधल्या फळीतील तीन अनुभवी फलंदाज पुजारा, कोहली व रहाणे यांनी जबाबदारी स्वीकारत निराश केले नाही. २५ व्या कसोटी शतकाकडे वाटचाल करताना विराट भावनाप्रधान वाटला. तो आपल्या धावांसाठी मेहनत घेत होता. त्याची प्रतिबद्धताही कमालीची होती. पुजारा व राहणे महत्त्वाच्या भागीदारीमध्ये चांगली साथ देण्यास प्रयत्नशील होते, पण त्यांना अधिक यश मिळाले नाही. डावावर विराटचे नियंत्रण बघितल्यानंतर मी प्रभावित झालो, पण तो बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. पहिल्या डावात भारतीय संघ ४३ धावांनी पिछाडीवर पडला, पण खेळपट्टीचे स्वरुप बघता ही आघाडी महत्त्वाची आहे. खेळपट्टीवरील भेगा रुंदावण्यास प्रारंभ झाला आहे आणि चेंडूचा टप्पा त्यावर पडत आहे. त्यामुळे चेंडूचा अंदाज घेण्यास अडचण भासत आहे. मी पराभवासाठी ही सबब देणार नाही, पण भारताला यापूर्वी आॅस्ट्रेलियाच्या उर्वरित सहा विकेट झटपट घ्याव्या लागतील.
यजमान संघाकडे एकूण १७५ धावांची आघाडी असून २४०-२५० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी लढत चौथ्या व पाचव्या दिवसापर्यंत चालेल. लक्ष्य गाठण्यासाठी भारताला चांगली सुरुवात मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मधल्या फळीवर दडपण येणार नाही. राहुल व विजय यांनी अॅडलेड कसोटीत दुसºया डावात चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यांनी जर त्या कामगिरीची पुनरावृत्ती केली तर भारतासाठी बरेच काही शक्य होईल.
Web Title: India has to perform well
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.