भारतीय क्रिकेट संघाला कसोटीपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनं वन डे मालिकेतही पराभूत केलं. वन डे मालिकेत तर भारताकडून यजमानांसाठी कुठेच आव्हान असल्याचे जाणवले नाही. आफ्रिकेनं तीनही वन डे सामने सहज जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली. मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश, गोलंदाजांची सुमार कामगिरी यामुळे भारताचा मानहानिकारक पराभव झाला. त्यात भर म्हणून आता आयसीसीनं टीम इंडियावर दंडात्मक कारवाई केली आहे. तिसऱ्या वन डे सामन्यांत षटकांची गती संघ (Slow Over Rate) ठेवल्यामुळे टीम इंडियाच्या मॅच फीमधील 40 टक्के रक्कम ही दंड म्हणून वसूल केली जाणार आहे.
तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं क्विंटन डी कॉकच्या ( १२४) शतकी, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनच्या ( ५२) अर्धशतकी आणि डेव्हिड मिलर ( ३९) व ड्वेन प्रेटोरीयस ( २०) यांच्या योगदानाच्या जोरावर २८७ धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक ३, दीपक चहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. धावांचा पाठलाग करताना भारताला २८३ धावांपर्यंतच मजल मारता आली. मधल्या फळीनं पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. शिखर धवन ( ६१) व विराट कोहली ( ६५) खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीय संघ जिंकेल असे वाटत होते. श्रेयस अय्यर ( २६) व सूर्यकुमार यादव ( ३९) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. दीपक चहरनं ३४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ५४ धावा करताना भारताला विजयी मार्गावर आणले होते, परंतु अवघ्या ४ धावांनी आफ्रिकेनं बाजी मारली.
मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टनं सांगितलं की, टीम इंडिया निर्धारीत वेळेनुसार दोन षटकं मागे चालली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई केली गेली.