मेलबोर्न : शानदार वेगवान गोलंदाजी आक्रमणाच्या जोरावर भारतीय संघाकडे आगामी पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची बरोबरीची संधी आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी, त्यांचा वेगवान मारा अलीकडच्या कालावधीत शानदार झाला आहे. त्यामुळे भारतीय संघ आता पूर्वीच्या वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया या संघांसारखा भासतो. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळविता आला आणि विश्व कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठता आली. आता त्यांच्याकडे इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची बरोबरीची संधी आहे. भारतातर्फे मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचसोबत त्यांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांची प्रशंसा केली. न्यूझीलंडचा सध्याचा वेगवान मारा वेस्ट इंडिडच्या १९७० ते १९९० च्या काळातील गोलंदाजी चौकडीप्रमाणे असल्याचे ते म्हणाले.
चॅपेल म्हणाले, ‘न्यूझीलंडला विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील वँगनर व काईल जेमिसनच्या वेगवान गोलंदाजी चौकडीने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.’