- अयाझ मेमन
पुण्यात झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात बाजी मारत भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली. महत्त्वपूर्ण यासाठी कारण गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये भारत सलग मालिका जिंकत आला आहे. या जोरावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने अत्यंत मजबूत रेकॉर्ड बनवला होता. मात्र, न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात बाजी मारत भारताच्या वर्चस्वाला धक्का दिला होता आणि आपली विजयी मालिका कायम राखण्यासाठी भारताला हा विजय आवश्यक होता. या विजयाचे एक कारण म्हणजे, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने केवळ २३० धावा केल्या. यासाठी सर्व श्रेय भारतीय गोलंदाजांना द्यावे लागेल. कारण, माझ्या मते या खेळपट्टीवर ३००च्या आसपास धावा शक्य असताना केवळ २३० धावांवर प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात भारताने यश मिळवले. यात सर्वात जास्त कौतुक सामनावीर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचे करावे लागेल. या दोघांची जोडी भारतासाठी जबरदस्त ठरत आहे. तसेच, फिरकीपटूंनी चांगला मारा केला. यानंतर धावांचा पाठलाग करताना शिखर धवन, दिनेश कार्तिक यांच्यासह सर्वांनीच आपआपले योगदान दिले. त्यामुळे मालिकेतील कानपूर येथे रंगणाºया तिसºया सामन्याला अंतिम सामन्याचे स्वरूप आले असून यातील संभाव्य विजेत्याबद्दल बोलायचे झाल्यास घरचे वातावरण पाहता भारताचे पारडे नक्कीच वरचढ असेल. पण, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताला सांभाळून राहावे लागेल. त्यांच्याकडे फलंदाज व गोलंदाज चांगले आहेतच, पण यामध्ये जर का केन विल्यिम्सन बहरला, तर मात्र भारतीय संघाची मोठी परीक्षा ठरेल. दुसरीकडे, पुण्यात सामन्याव्यतिरिक्त खेळपट्टीवरून खूप मोठा वाद उद्भवला. पुण्याचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचा प्रथमश्रेणी क्रिकेट रेकॉर्ड शानदार आहे. एका स्टिंग आॅपरेशनद्वारे ते एका पत्रकारासह खेळपट्टीविषयी चर्चा करत असल्याचे निदर्शनास आले. त्या पत्रकाराने स्वत:ची बुकी म्हणून ओळख केली होती. या खेळपट्टीवर किती धावा होतील, कशा प्रकारे खेळ होईल, अशी माहिती क्युरेटर यांनी त्या कथित बुकीला पुरवली. तरी, याबाबतचे पूर्ण व्हिडीओ मी अद्याप पाहिले नाही. पण, काहीही असो, जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा सर्वांत प्रथम साळगावकर यांनी भ्रष्टाचारविरोधी समितीकडे तक्रार करायला हवी होती. हे त्यांचे कर्तव्य होते. त्यामुळे यानंतर कोणतेही कारण देत ते स्वत:चा बचाव करू शकत नव्हते. कारण, खूप कडक नियम असल्याने या प्रकरणाचा साळगावकर यांच्यासह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनलाही मोठा झटका बसला आहे. तसेच, या प्रकारामध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले क्युरेटरही अडकल्याने हा एक प्रकारे भारतीय क्रिकेटलाही झटका आहे.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: India have to play against New Zealand to maintain the winning series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.