Asia Cup, INDWvsMALW : भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत आज मलेशियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज मलेशियाचा सामना करण्यासाठी संघ मैदानावर उतरला. स्मृती मानधनाला आज विश्रांती देण्यात आली आणि तिच्याजागी संधी मिळालेल्या सब्बीनेनी मेघना हिने दमदार ओपनिंग करून दिली. शफाली वर्मा व मेघना यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारताचा मजबूत पाया सेट केला. त्यानंतर अन्य फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून थेट पाकिस्तानचा विक्रम मोडला.
मेघना व शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी ११६ धावा जोडल्या. मेघना ५३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारांसह ६९ धावांवर माघारी परतली. शफालीने ३९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. रिचा घोषने त्यानंतर खिंड लढवली. किरण नवगिरे ( ०), राधा यादव (८ ) यांना अपयश आले. रिचाने १९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ३३ धावा केल्या, तर दयालन हेमलताने ४ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह १० धावा जोडल्या. भारतीय महिलांनी २० षटकांत ४ बाद १८१ धावा केल्या. महिलांच्या आशिया चषक स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी पाकिस्तानी महिलांनी २०१८मध्ये मलेशियाविरुद्धच १७८ धावा केल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"