T20 World Cup मध्ये आज भारतीय संघ Super 8 च्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आणि त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचे आव्हान असेल. अफगाणिस्तानला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही, कारण त्यांनी गट साखळीत न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाला फिरकीच्या जोरावर पाणी पाजले. त्यामुळे टीम इंडिया आजच्या लढतीत संघात काही बदल करतील असे संकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ( Rahul Dravid) दिले आहेत. काल राहुल द्रविडने पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली आणि यावेळी एका प्रश्नावर तो नाराज झालेला पाहायला मिळाला.
बार्बाडोस येथे होणाऱ्या सामन्यात राहुल द्रविड टीम इंडियासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे आणि या मैदानावर एक खेळाडू म्हणून त्याच्यासाठी काही चांगल्या आठवणी नाहीत. याच आधारावर जेव्हा पत्रकाराने द्रविडला प्रश्न विचारला तेव्हा तो काहीसा संतापला आणि प्रश्नावर भडकला. त्यावर द्रविडने पत्रकाराला मानसशास्त्राचे ज्ञान दिले. तो म्हणाला मी असा माणूस आहे, जो मागचं विसरून त्वरीत पुढे जातो आणि मी आता फक्त एक प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी करण्याचा विचार करत आहे, भूतकाळातील खेळाडू म्हणून माझ्या कामगिरीचा विचार करत नाही.
- रिपोर्टर : "राहुल, एक खेळाडू म्हणून तू इथे खेळला आहेस. १९९७ साली येथील कसोटीच्या सर्वोत्तम आठवणी नाहीत?"
- द्रविड : " खूप खूप धन्यवाद मित्रा! माझ्या इथेही काही चांगल्या आठवणी आहेत."
- रिपोर्टर : "खरं तर हा माझा प्रश्न आहे. उद्या तुम्हाला नवीन आणि खूप चांगल्या आठवणी बनवण्याची संधी मिळेल?"
- द्रविड : "भल्या माणसा! मी नवीन काहीही बनवण्याचा प्रयत्न करत नाही!
१९९७ मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा सामना केला होता आणि त्यात द्रविडने ७८ आणि २ धावा केल्या होत्या. पण, भारतीय संघ ब्रिजटाऊनमध्ये ३८ धावांनी पराभूत झाला. या आठवणींबाबत द्रविड म्हणाला, मी खूप लवकर गोष्टींमधून पुढे जातो. ती माझ्या गोष्टींपैकी एक आहे. मी मागे वळून पाहत नाही. मी सध्या काय करत आहे, ते पाहण्याचा प्रयत्न करतो. ९७ किंवा काही गोष्टींबद्दल मला काळजी नाही.