भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं चांगलं जमतं. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ही जोडी टीम इंडियाला एकामागून एक यश मिळवून देत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन कसोटी मालिका विजय, इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेतील विजयी आघाडी, यामुळे विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वोत्तम कर्णधार ठरतोय. मात्र, जेव्हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विचार केला जातो, तेव्हा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला मात देणं अवघडच आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही ते मान्य केलं आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीच्या नेतृत्वाला तोड नाही आणि तो ग्रेटेस्ट कर्णधार आहे, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा टीम इंडियासोबतचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्यांनी करारात वाढ करण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून प्रशिक्षकपदाचा शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नाला महेंद्रसिंग धोनीचीही साथ मिळणार आहे. बीसीसीआयनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी MS Dhoniची टीम इंडियाचा मेंटॉर ( मार्गदर्शक) म्हणून निवड केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत आणि असा पराक्रम करणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे.
२००७मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिल्यावहिल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर २०११मध्ये वन डे वर्ल्ड कप उंचावून २८ वर्षांचा दुष्काळ संपवला. त्यापाठोपाठ २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ''धोनी हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार आहे. आयसीसी स्पर्धांमधील तुम्ही त्याचे रेकॉर्ड्स पाहा. त्यानं काय जिंकलेलं नाही?, आयपीएल, चॅम्पियन्स लीग, आयसीसीच्या सर्व स्पर्धा, दोन वर्ल्ड कप, हे सर्व त्यानं जिंकलं आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या आसपास कोणीच नाही. तो ग्रेटेस्ट आहे. तुम्ही त्याला किंग काँग म्हणू शकता,''असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले,''तुम्ही धोनीला जेव्हा एखाद्या संघाचे नेतृत्व करताना पाहता आणि तेव्हा तुम्हाला खात्री आणि परिस्थिती हाताळण्यासाठी उपयुक्त संयमीपणा दिसतो. चेन्नई सुपर किंग्सकडेच पाहा ना.''