Join us  

Shakib Al Hasan, IND vs BAN: "आम्ही इथे T20 World Cup जिंकायला आलोच नाहीये"; भारताविरूद्धच्या मॅचआधी बांगलादेशी कर्णधाराचे अजब विधान

भारताचा उद्या बांगलादेशशी होणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 12:30 PM

Open in App

Shakib Al Hasan, India vs Bangladesh : एकीकडे सर्व संघ टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. प्रत्येक संघ टी२० वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी घाम गाळत असताना दुसरीकडे बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने मात्र, आपला संघ T20 World Cup जिंकण्यासाठी आलोच नसल्याचे म्हटले आहे. शाकिब अल हसनने भारताविरुद्धच्या सामन्याआधी हे अजब आणि तितकेच धक्कादायक विधान केले. शाकिब अल हसनने मीडियासमोर स्पष्टपणे सांगितले की, टीम इंडिया येथे वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी आली आहे, आमचा संघ येथे टी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेलाच नाहीये.

"भारतीय संघाविरूद्धच्या सामन्यात स्टेडियम हाऊसफुल असेल असा माझा अंदाज असेल. कारण जगात कुठेही गेलात तरी भारतीय संघाचे चाहते त्यांना पाठिंबा द्यायला मोठ्या संख्येने आल्याचे दिसतात. आमचा सामना नक्कीच रंगतदार होईल यात वाद नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. टीम इंडिया येथे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आली आहे, आम्ही येथे वर्ल्ड कप जिंकायला आलेलोच नाहीये. त्यामुळे जर आम्ही भारताविरूद्ध जिंकलो तर विचार करा तो निकाल किती धक्कादायक ठरेल. आणि आम्ही नक्कीच भारताला धक्का द्यायचा प्रयत्न करू," असे शाकिब म्हणाला.

"आम्ही या वर्ल्ड कप मध्ये शिल्लक राहिलेले खेळ एन्जॉय करणार आहोत. आमचे दोन सामने भारत आणि पाकिस्तान यांच्याविरूद्ध आहेत. त्यामुळे यापैकी एक सामना जरी आम्ही जिंकलो तरी तो धक्कादायक निकाल ठरू शकेल. हे दोन्ही संघ कागदावर पाहता आमच्यापेक्षा बरेच बलवान दिसतात, पण म्हणून आम्ही त्यांना हरवू शकत नाही असं अजिबात नाही. याच स्पर्धेत आयर्लंडने इंग्लंडला आणि झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवल्याचे आपण पाहिले आहे. तसाच चमत्कार आम्ही करू शकलो तर आम्हाला नक्कीच आनंद होईल," अशी भावना शाकिबने व्यक्त केली.

"प्रत्येक सामना हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच खेळतो. आम्हाला कोणा एका प्रतिस्पर्धी संघावर लक्ष केंद्रित करायचे नाही. आम्ही आमच्या प्लॅन्सप्रमाणे खेळ खेळतोय. या वर्ल्ड कपमध्ये आम्ही आमच्या खेळाडूंच्या स्ट्राईक रेटचा फार विचार करत नाहीये. उत्तम सांघिक संघर्ष करणे हा आमच्या टीमचा प्लॅन आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तीनही क्षेत्रात चांगली कामगिरी करणे हे आमचे ध्येय आहे," असेही शाकिबने पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२बांगलादेशभारतपाकिस्तान
Open in App