कोरोना व्हायरसमुळे यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही व्हायरसमुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता जवळपास सहा-सात महिने देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका झालेली नाही. शिवाय स्थानिक क्रिकेट स्पर्धाही होतील की नाही, यावर संदिग्धता आहे. आणखी किती काळ भारतीय चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने घरच्या मैदानावर पाहाता येणार नाही, याची कुणालाच कल्पना नाही. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनं शनिवारी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली.
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला
आयपीएलचा 13 वा मोसम यूएईत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांना टीम इंडियाला घरच्या मैदानावर खेळताना पाहण्यासाठ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाच्या संकटात इंग्लंडनं भारत दौरा स्थगित केला होता आणि आता हा दौरा फेब्रुवारीत आयोजित करण्याचे संकेत गांगुलीनं दिले आहेत. आयपीएलच्या 14व्या मोसमापूर्वी भारत-इंग्लंड यांच्यात मर्यादित षटकांची मालिका आयोजित केली जाणार आहे.
गांगुलीनं सांगितले की,''भारतीय संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे आणि पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात घरच्या मैदानावर इंग्लंडचा सामना करणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये आयपीएलच्या 14व्या मोसमाचे आयोजन केले जाईल,''असे पत्र गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले आहे.
2021हे वर्ष भारतीय खेळाडूंना थकवणारे वर्ष असेल. 2020मध्ये स्थगित झालेल्या मालिकांचे पुढील वर्षी आयोजन केलं जाईल.''स्थानिक स्पर्धांसाठी सध्या ऑफ सिजन आहे आणि स्थानिक स्पर्धा सुरू करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहेत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षितता हे महत्त्वाचे आहे. स्थानिक क्रिकेट सुरू होणं, हे
बीसीसीआयसाठीही महत्त्वाचे आहे आणि आम्ही त्यावर सातत्यानं चर्चा करत आहोत,''असेही त्या पत्रात नमूद केलं आहे. सर्व संलग्न संघटनांना त्याबाबात सुचना केल्या गेल्या आहेत. येत्या काही महिन्यात कोरोना परिस्थिती सुधारल्यावर स्थानिक स्पर्धा सुरू करण्याचा विचार केला जात आहे.