सिलहट (बांग्लादेश) : अपेक्षेप्रमाणे एकतर्फी रंगलेल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य भारताने महिला आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुबळ्या थायलंडला ७४ धावांनी नमवले. यासह भारताने विक्रमी आठव्यांदा आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा थायलंडचा निर्णय चुकला. भारताने २० षटकांत ६ बाद १४६ धावा केल्यानंतर थायलंडला २० षटकांत ९ बाद ७४ धावांवर रोखले.
युवा सलामीवीर शेफाली वर्मासाठी ही स्पर्धा शानदार ठरली. याआधी सातत्याने अपयशी ठरत असल्याने शेफालीवर बरीच टीका झाली. मात्र, उपांत्य सामन्यात तिने भारताच्या विजयामध्ये निर्णायक अष्टपैलू खेळ केला. शेफालीने २८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४२ धावांचा तडाखा दिल्यानंतर गोलंदाजीत ९ धावांमध्ये एक बळी घेत दमदार अष्टपैलू खेळ केला. या जोरावर शेफाली सामनावीर ठरली. लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडची फलंदाजी सहज कोलमडली.
आत्मविश्वासासाठी धावा काढाव्याच लागणार
जेमिमा रॉड्रिग्ज आणि माझ्यामध्ये झालेल्या भागीदारीमुळे आम्ही चांगली धावसंख्या उभारू शकलो. जेव्हा तुम्ही फार खेळत नसता, तेव्हा आत्मविश्वास मिळविण्यासाठी धावा काढणे आवश्यक बनते. आता माझ्या खेळाप्रति आत्मविश्वास उंचावला आहे, पण तरीही मी यावर काम करत राहणार आहे. संघासाठी योगदान देणे नेहमीच चांगले ठरते.
- हरमनप्रीत कौर, कर्णधार - भारत
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ६ बाद १४६ धावा (शेफाली वर्मा ४२, हरमनप्रीत कौर ३६, जेमिमा रॉड्रिग्ज २७; सोर्नारिन तिपोच ३/२४) वि. वि. थायलंड : २० षटकांत ९ बाद ७४ धावा (नताया बूचाथम २१, नेरुइमोल चाइवाइ २१; दीप्ती शर्मा ३/७, राजेश्वरी गायकवाड २/१०).
पाक पराभूत, भारतापुढे श्रीलंकेचे आव्हान
श्रीलंकेने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानला केवळ एका धावेने नमवत महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदासाठी लंकेला भारताविरुद्ध खेळावे लागेल. प्रथम फलंदाजी करताना लंकेने २० षटकांत ६ बाद १२२ धावा केल्या. यानंतर पाकिस्तानला २० षटकांत ६ बाद १२१ धावांवर रोखत लंकेने बाजी मारली.
Web Title: India in final for eighth time; Women's Asia Cup; Defeated Thailand by 74 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.