मुंबई - भारतीय संघ २०२४ च्या टी-२० विश्वचषकात जेतेपदाचा मोठा दावेदार असून चॅम्पियन बनण्यासाठी या संघाला बाद फेरीचे अखेरचे दोन सामने जिंकावेच लागतील, असे मत माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सोमवारी व्यक्त केले.
भारतीय संघाने वनडे विश्वचषकात ४५ दिवस शानदार कामगिरीसह सलग दहा सामने जिंकले. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकतर्फी पराभव झाल्यामुळे जेतेपदाने हुलकावणी दिली. एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शास्त्री म्हणाले, ‘काहीही सहज मिळत नाही. महान सचिनलादेखील विश्वचषक जिंकण्यासाठी तब्बल सहा विश्वचषकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. विश्वचषकासारखी स्पर्धा सहज जिंकता येत नाही. एक विश्वचषक जिंकण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावीच लागते. फायनलच्या दिवशी सर्वाेत्कृष्ट कामगिरी करावी लागते.’
फायनलमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही साखळी फेरीत किती चांगला खेळ केला, याला महत्त्व नसते, असे सांगून शास्त्री पुढे म्हणाले, ‘सुरुवातीचे अडथळे पार केल्यानंतर केवळ चारच संघ रिंगणात असतात. त्यामुळे अखेरच्या दोन सामन्यांत दमदार कामगिरीची गरज भासते.
त्या दोन सामन्यांत तुमची कामगिरी चांगली झाल्यास चॅम्पियन बनू शकता. ऑस्ट्रेलियाने हेच केले. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर जेव्हा चांगल्या कामगिरीची गरज होती तेव्हा चवताळून आक्रमक खेळ केला.’
‘आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाकडे अनेक युवा खेळाडू आहेत. टी-२० विश्वचषकाचे आयोजन ४ जून २०२४ पासून अमेरिका आणि वेस्ट इंडीज संयुक्तपणे करणार आहेत. या स्पर्धेत भारत बलाढ्य आव्हान सादर करू शकतो. मुख्य खेळाडूंची ओळख पटली आहेच, आता तुमचे लक्ष्य केवळ झटपट प्रकारावरच केंद्रित असायला हवे,’ असा सल्ला शास्त्री यांनी दिला आहे.
Web Title: India is a big contender for the 2024 T20 World Cup title, but... Ravi Shastri's suggestive statement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.