WTC 2023-25 : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दुसरा डाव ८९ धावांवर गुंडाळला. नॅथन लियॉनने या कसोटीत ५०० विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघावर उपकार झाले आहेत.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात ४८७ धावा उभ्या केल्या. डेव्हिड वॉर्नरने १६४ धावा ठोकून संघाचा पाया रचला. मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या मिचेल मार्शने ९० धावा केल्या, तर ट्रॅव्हिस हेड (४०), स्टीव्ह स्मिथ (३१) आणि अॅलेक्स कॅरी (३४) यांच्या योगदानाने ऑस्ट्रेलियाला बळ दिले. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या आमेर जमालने पाच बळी घेतले.
अब्दुल्ला शफीक ( ४२) आणि इमाम-उल-हक ( ६२) यांच्यामुळे पाकिस्तानने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली. कर्णधार शान मसूदने ३० धावा जोडल्या, परंतु त्याच्या विकेटनंतर पाकिस्तानचा डाव २७१ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २३३ धावांची भर घालती. उस्मान ख्वाजाने ९० धावा केल्या आणि स्टीव्ह स्मिथने ४५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कमाल करून पाकिस्तानी फलंदाजांना वेठीस धरले आणि शेवटी त्यांना ८९ धावांवर गुंडाळले. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसरा सामना २६ डिसेंबरला मेलबर्न येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरील पाकिस्तानचा हा १५ वा पराभव ठरला.
पाकिस्तानचा पराभव, भारताचा फायदा
पाकिस्तानच्या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारत १६ गुण व ६६.६७ टक्क्यांसह अव्वल स्थानावर आला आहे. पाकिस्तानचे टक्के जरी समान असले तरी ते भारतापेक्षा अधिक सामने खेळले आहेत आणि त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर सरकले. न्यूझीलंड व बांगलादेश प्रत्येकी ५० टक्क्यांसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलिया ४१.६७ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
Web Title: India is at the top of the points table in WTC 2023-25, Pakistan all out for 89 as Australia win first Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.