नवी दिल्ली- फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या टी-20 सामन्यात भारताच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 203 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. शिखर धवन आणि रोहित शर्माच्या 158 धावांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे. शिखर धवन 52 चेंडूंत 80 धावा काढून माघारी परतला आहे. त्यानंतर मैदानावर आलेला पंड्या भोपळाही न फोडता बाद झाला आहे.रोहित शर्मानंही 55 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांच्या जोरावर 80 धावांची खेळी केली आहे. न्यूझीलंडनं नाफेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आशिष नेहरा स्वतःच्या कारकिर्दीतला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय. या सामन्यानंतर तो क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज नेहरानं 18 वर्षांपासून स्वतःच्या क्रिकेटमधील कारकिर्दीला सुरुवात केली. 1999मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात आशिष नेहरा कोलंबोत श्रीलंकेच्या विरोधात खेळला होता.
आघाडीच्या गोलंदाजांमध्ये आशिष नेहराचा समावेश कधीच झाला नाही. स्वत: नेहरानेही तशी अपेक्षा केली नसेल. चांगली गुणवत्ता असुनही सततच्या दुखापतींमुळे नेहराची कारकीर्द म्हणावी तशी बहरली नाही. 18 वर्षांच्या काळात जवळपास 12 शस्रक्रिया झेलूनही नेहराने क्रिकेटच्या मैदानातील आपले स्थान कायम राखले. 1999 साली पहिल कसोटी सामना खेळणाऱ्या आशिष नेहराला कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द फार बहरू शकली नाही. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र त्याने आपली उपयुक्ततता वेळोवेळी सिद्ध केली.
आशिष नेहराचे नाव आले की, 2003 च्या विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धची साखळी लढत नरजेसमोर यायलाच हवी. नासिह हुसेन, मायकेल ट्रेस्कोस्ट्रिक, अँड्यू फ्लिंटॉफ अशा फलंदाजांसमोर नेहराने आपल्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय स्पेल टाकला होता. त्या लढतीत टिपलेले 23 धावांत 6 बळी ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. श्रीलंकेविरुद्धचा असाच एक सामना नेहराने शेवटच्या षटकात जिंकून दिला होता. त्यावेळी श्रीलंकेने भारताने दिलेल्या 400 धावांच्या आव्हानाचा जवळपास पाठलाग केला होता. पण नेहराने टाकलेले शेवटचे षटक भारतासाठी निर्णायक ठरले होते.