डऱ्हम : कौंटी सिलेक्ट एकादशविरुद्ध सराव सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी चमकदार कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी उमेशने २२ धावात ३ तर सिराजने ३२ धावात दोन गडी बाद करताच भारताच्या ३११ धावांना उत्तर देणाऱ्या कौंटीचा पहिला डाव ८२.३ षटकात सर्व बाद २२० धावात संपुष्टात आल्यामुळे भारताने ९१ धावांची आघाडी मिळविली. प्रतिस्पर्धी संघाकडून सलामीचा हसीब हमिद याने शतकी खेळी करीत सर्वाधिक ११२,लेंडम जेम्स २७ आणि लियॉम पॅटरसनने ३३ धावांचे योगदान दिले. त्याआधी कालच्या ९ बाद ३०६ वरुन पुढे खेळणाऱ्या भारताचा पहिला डाव ५ धावांची भर घालताच संपुष्टात आला.
आवेश खान मालिकेबाहेर, शुभमन गिल परतला
युवा वेगवान गोलंदाज आवेश खान डऱ्हम येथे भारताच्या सराव सामन्यादरम्यान जखमी झाला. २४ वर्षांचा आवेश अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे सामन्याबाहेर झाला, पण आता मालिकेतून बाहेर होणे निश्चित मानले जात आहे. या दौऱ्यात तो राखीव खेळाडू होता. जखमेमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडलेला युवा सलामीवीर शुभमन गिल मायदेशी परतला आहे. दरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे खेळू न शकलेला कर्णधार विराट कोहली याने बुधवारी नेट्मध्ये फलंदाजी केली.