लखनौ - कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये वर्चस्व कायम राखल्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्यांच्या आवडीच्या स्वरूपामध्ये पहिल्या लढतीत पराभूत करणारा भारतीय संघ मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत विजयी मोहीम कायम राखत मालिकेत विजयी आघाडी घेण्यास उत्सुक आहे.
भारताचा विंडीजविरुद्ध टी-२०मध्ये चार सामन्यांतील पराभवाचा क्रम रविवारी कोलकातामध्ये खंडित झाला. विंडीज संघासाठी हा दौरा आतापर्यंत चांगला ठरलेला नाही. त्यामुळे दुसºया टी-२० सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल.
भारताने रविवारी विजयापूर्वी विंडीजविरुद्ध अखेरचा विजय २३ मार्च २०१४ मध्ये बांगलादेशमध्ये विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान मिळवला होता. भारताने ईडन गार्डन्सवर पाच विकेट राखून विजय मिळवल्यानंतर विद्यमान विश्व चॅम्पियनविरुद्ध आपला जय-पराभवाचा रेकॉर्ड ५-३ असा केला आहे. ईडन गार्डन्सवर भारताला लक्ष्याचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला; पण विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अशा प्रकाराचा विजय महत्त्वाचा ठरतो. महेंद्रसिंह धोनी न खेळलेला हा पहिलाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. कारण त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याला फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नसली तरी यष्टिरक्षण करताना त्याची चपळता आणि त्याला असलेली क्रिकेटची जाण संघासाठी महत्त्वाची ठरते.
कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करीत असलेला रोहित शर्मा पहिल्या लढतीत अपयशी ठरला. तो दुसºया लढतीत हे अपयश पुसून टाकण्यासाठी प्रयत्नशील राहील. या स्टेडियममधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना राहील.
१३० धावांचे लक्ष्य गाठणे कठीण होईल : क्यूरेटर
लखनौ : टी-२० फलंदाजांचा खेळ असला तरी उद्या मंगळवारी येथे होणारा दुसरा सामना कमी धावसंख्येचा असेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. २४ वर्षांनंतर येथे आंतरराष्टÑीय क्रिकेट परतले. नवनिर्मित इकाना स्टेडियमवर हा पहिलाच सामना असेल. स्थानिक क्यूरेटरनुसार येथे फलंदाजी करणारा संघ १३० वर धावा काढणार असेल तर तो विजयी होऊ शकतो.
हा सामना मोठ्या धावसंख्येचा नसेल. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला सुकलेले गवत आहे. खेळपट्टीवर अधिक उसळी नसल्याने सुरुवातीपासूनच फिरकीला अनुकूल असेल. ओडिशातील बोलंगीर येथील मातीपासून खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. याशिवाय सीमारेषा मोठी असल्याने मोठे फटके मारणे अवघड असेल.
खेळपट्टी बनविण्याचे काम
बीसीसीआयचे मुख्य क्यूरेटर दलजितसिंग यांना सोपविण्यात आले होते. त्यांनी यूपीसीएच्या क्यूरेटरची या कामात मदत घेतली. येथे स्थानिक मातीचा वापर झाला असता तर हा सामना मोठ्या धावसंख्येचा ठरला असता, असे एका स्थानिक क्यूरेटरचे मत आहे. याशिवाय दवबिंदूंचादेखील त्रास होऊ शकतो. आऊटफिल्ड शानदार आहे. उत्तर भारतात थंडी पडायला सुरुवात झाल्यामुळे पहिल्या चेंडूपासून येथे फरक जाणवणार आहे.
रोहित व्यतिरिक्त सलामीवीर फलंदाज शिखर धवन, के. एल. राहुल, ऋषभ पंत आणि मनीष पांडे यांना पहिल्या लढतीत विशेष चमक दाखविता आली नाही.
लखनौमध्ये चाहत्यांना दिवाळीमध्ये आपल्या फलंदाजांकडून चौकार, षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. गोलंदाजीमध्ये चायनामन कुलदीप यादव, पांड्या आणि खलिल अहमद यांनी चांगली कामगिरी केली; पण उमेश यादव व जसप्रीत बुमराह यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा राहील.
कसोटी व वन-डे मालिका गमावल्यानंतर वेस्ट इंडिज संघ त्यांचे आवडते स्वरूप असलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. पहिल्या लढतीत त्यांची फलंदाजी ढेपाळली. ईडन गार्डन्सवरील लढतीत केलेल्या चुका सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. विंडीजला आंद्रे रसेलची उणीव भासत आहे. दुखापतीमुळे त्याला मालिकेला मुकावे लागले.
कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली; पण त्याला फलंदाजीमध्ये योगदान देत आपल्या खेळाडूंना प्रेरित करावे लागेल. युवा वेगवान गोलंदाज ओशेन थॉमसने कोलकातामध्ये भारताच्या सलामीच्या जोडीची परीक्षा घेतली. त्याला किमो पॉल व अन्य खेळाडूंकडून सहकार्य मिळणे आवश्यक आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, वाशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह,
के. खलिल अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम.
वेस्ट इंडिज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर, शाई होप, ओबेद मैकॉय, किमो पॉल, खारी पियरे, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरण, रोवमन पॉवेल, दिनेश रामदिन, शेरफेन रदरफोर्ड, ओशाने थॉमस.
सामन्याची वेळ : रात्री ७ वाजल्यापासून
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियम
Web Title: India look forward to winning the series, second match against the West Indies today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.