माऊंट मोनगानुई : भारताला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत ३१ वर्षांत प्रथमच ‘व्हाईटवॉश’ला सामोरे जावे लागले तर, न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव करीत मालिकेत ३-० ने सरशी साधली. भारतीय संघाला यापूर्वी १९८९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ५-० ने पराभव स्वीकारावा लागला होता.
भारताच्या ७ बाद २९६ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ५ बाद ३०० धावा केल्या. हेन्री निकोल्सने १०३ चेंडूंना सामोरे जाताना ८० आणि मार्टिन गुप्टिलने ४६ चेंडूंमध्ये ६६ धावांची खेळी केली. कोलिन डी ग्रँडहोमने २८ चेंडूंमध्ये नाबाद ५८ धावा केल्या.त्याआधी, केएल राहुलने वन-डे कारकिर्दीतील झळकावलेल्या चौथ्या शतकाच्या जोरावर भारताने निराशाजनक सुरुवातीनंतर ७ बाद २९६ धावांची आव्हानात्मक मजल मारली. विजयासाठी २९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात शानदार झाली. गुप्टिल व निकोल्स यांनी ४० चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. या दोघांनी सलामीला १०६ धावांची भागीदारी केली.
गुप्टिलने आपल्या खेळीत सहा चौकार व चार षटकार लगावले. भारतातर्फे शार्दुल ठाकूर व नवदीप सैनी महागडे ठरले. ठाकूरने ८७ तर सैनीने ६८ धावा दिल्या. जसप्रीत बुमराहला या मालिकेत एकही बळी घेता आला नाही. युजवेंद्र चहलने ४७ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याने १७ व्या षटकात गुप्टिलला बाद केले. दुसºया टोकाकडून सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या निकोल्सने डावाची सूत्रे स्वीकारताना ७२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने केन विलियम्सनसह (२२) दुसºया विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. चहलने आणखी दोन बळी घेतले. रवींद्र जडेजाने रॉस टेलरला (१२) झटपट तंबूत परतवले.
न्यूझीलंडची ३३ षटकांत ४ बाद १८९ अशी स्थिती होती. डी ग्रँडहोमने त्यानंतर २१ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत सहा चौकार व तीन षटकारांचा समावेश आहे. भारताचे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा निराशाजनक झाले. त्याआधी, भारतातर्फे राहुलने ११३ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या. भारताची १३ व्या षटकात ३ बाद ६२ अशी अवस्था होती, पण राहुलने डाव सावरला. त्याने श्रेयस अय्यरसोबत १०० धावांची भागीदारी केली. अय्यरने ६३ चेंडूंमध्ये ६२ धावा केल्या. राहुलने त्यानंतर मनीष पांडेसोबत पाचव्या विकेटसाठी ४८ चेंडूंमध्ये ४२ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडतर्फे हामिश बेनेटने ६४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. यजमान संघातर्फे दुखापतीतून सावरलेल्या कर्णधार केन विलियम्सनने पुनरागमन केले. फिरकीपटू मिशेल सँटनेरला टॉम ब्लंडेलच्या जागी संधी देण्यात आली. भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. काईल जेमीसनने सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल (१) याला बाद केले. सातव्या षटकात भारताला सर्वात मोठा धक्का बसला. त्यावेळी कर्णधार विराट कोहली (९) बाद झाला. सलामीवीर पृथ्वी शॉ याने ४२ चेंडूंत ४० धावा केल्या.
अय्यर व राहुल यांनी ५२ चेंडूंमध्ये ५० धावा जोडल्या. अय्यरला जिम्मी नीशामने तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर राहुलने ६६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. राहुलचे शतक १०४ चेंडूंमध्ये पूर्ण झाले. भारतीय संघाने डेथ ओव्हर्समध्ये २७ धावांत ३ बळी गमावले. त्यामुळे संघाला ३०० चा पल्ला ओलांडता आला नाही.धावफलकभारत : पृथ्वी शॉ धावबाद ४०, मयंक अग्रवाल त्रि.गो. जेमीसन ०१, विराट कोहली झे. जेमीसन गो. बेनेट ०९, श्रेयस अय्यर झे. ग्रँडहोम गो. नीशाम ६२, केएल राहुल झे. जेमीसन गो. बेनेट ११२, मनीष पांडे झे. सँटनेर गो. बेनेट ४२, रवींद्र जडेजा नाबाद ०८, शार्दुल ठाकूर झे. ग्रँडहोम गो. बेनेट ०७, नवदीप सैनी नाबाद ०८. अवांतर (७). एकूण ५० षटकांत ७ बाद २९६. गोलंदाजी : साऊदी ९-०-५९-०, जेमीसन १०-०-५३-१, बेनेट १०-१-६४-४, डी ग्रँडहोम ३-०-१०-०, नीशाम ८-०-५०-१, सँटनेर १०-०-५९-०.न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल त्रि.गो. चहल ६६, हेन्री निकोल्स झे. राहुल गो. ठाकूर ८०, केन विलियम्सन झे. अग्रवाल गो. चहल २२, रॉस टेलर झे. कोहली गो. जडेजा १२, टॉम लॅथम नाबाद ३२, जिम्मी नीशाम झे. कोहली गो. चहल १९, कोलिन डी ग्रँडहोम नाबाद ५८. अवांतर (११). एकूण ४७.१ षटकांत ५ बाद ३००. गोलंदाजी : बुमराह १०-०-५०-०, सैनी ८-०-६८-०, चहल १०-१-४७-३, ठाकूर ९.१-०-८७-१, जडेजा १०-०-४५-१.