इंदूर - रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या घणाघाती फलंदाजीनंतर फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० लढतीत श्रीलंकेचा ८८ धावांनी धुव्वा उडवला. रोहित शर्माने फटकावलेले तुफानी शतक भारतीय संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. या विजयाबरोबरच भारतीय संघाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
भारताने विजयासाठी दिलेले 261 धावांचे आव्हान श्रीलंकेला पेलवले नाही आणि त्यांचा संपूर्ण डाव 172 धावांत आटोपला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन फलंदाजांनी चागंली सुरुवात केली. निरोशन डिकवेला आणि उपुल थरंगा यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करुन दिली. डिकवेला बाद झाल्यानंतर थरंगा (47) आणि कुशल परेरा (77) यांनी जोरदार फटकेवाजी करत सामन्यात रंगत आणली. मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर लंकेचा डाव 172 धावांवर आटोपला.
तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्माचे तुफानी शतक, लोकेश राहुलची आक्रमक फलंदाजी आणि शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद २६० धावा चोपल्या. भारताने फटकावलेल्या २६० धावा ही टी-२० क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सांघिक धावसंख्या ठरली. मात्र शेवटच्या दोन षटकात वेगाने धावा जमवता न आल्याने ऑस्ट्रेलियाचा टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा सांघिक विक्रम मोडण्याची भारताची संधी हुकली.
दुसऱ्या टी-20 लढतीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर पहिल्या ३ षटकांत भारताच्या अवघ्या 18 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने मैदानावर वादळ आणले आणि या वादळात श्रीलंकेचे गोलंदाज पाल्यापाचोळ्यासारखे उडाले.
चौथ्या षटकात आपल्या फलंदाजीचा गिअर बदलणारा रोहित शर्मा लंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. चौकार षटकारांची मालिका लावणाऱ्या रोहितने संघाला नवव्याच षटकात शंभरीपार पोहोचवले. त्यादरम्यान रोहितने 35 चेंडूत शतकाला गवसणी घातली. यादरम्यान रोहित आणि राहुलने भारताला १६५ धावांची सलामी दिली. रोहित बाद झाल्यानंतर राहुल (८९), धोनी (२८) आणि हार्दिक पांड्या (१०) यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अडीचशेपार मजल मारली.
Web Title: India lost by Sri Lanka by 88 runs, winning the T20 series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.