नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने काश्मीरच्या सीमेवर परेड केली, तरी भारताला त्याचा काहीही फरक पडत नाही, असे जम्मू-काश्मीरचे गव्हर्नर सत्यपाल मलिक यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.
सत्यापाल मलिक यांनी सांगितले की, " जम्मू-काश्मीरमधीलकलम 370 रद्द करून भारताने येथील लोकांच्या भल्याचा विचार केला आहे. आता येथील लोकांना आम्ही किती चांगल्या सोयी-सुविधा देऊ शकू, त्यांचे भले कसे करू शकू, याचा विचार आम्ही करत आहोत. अन्य कोणी काय करते, याचा आमच्यावर काही फरक पडणार नाही. त्यामुळे मियाँदाद जे काही करणार आहे, त्याचा भारतावर काहीही फरक पडणार नाही."
काय आहे प्रकरण ते जाणून घ्या...
पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद हा ठळकपणे दोन गोष्टींसाठी कायमचा लक्षात राहतो. एक म्हणजे, त्याने मारलेला चेतन शर्माला अखेरच्या चेंडूवर षटकार. दुसरी गोष्ट म्हणजे, 1992 च्या विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने माकडासारख्या उड्या मारल्या होत्या. सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या वातावरणामध्ये जावेद काही खेळाडूंसह काश्मीरच्या LOC वर परेड करणार आहे. जावेदने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. त्यानंतर पाकिस्तानने बऱ्याच पोकळ धमक्याही दिल्या. पण भारताने त्यांना काही भीक घातली नाही. त्यामुळे आता आम्ही किती शांतप्रिय आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न जावेद करणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावेद हा चांगला मित्र आहे. त्यामुळे आता काही गोष्टी इम्रान यांना करायला जमणार नाही. त्यामुळे त्यांनी आता जावेद यांची मदत घेण्याचे ठरवले आहे, असे म्हटले जात आहे. जावेद हे काही खेळाडूंबरोबर LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकवणार आहेत.
LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकावून जावेद नेमकं काय साध्य करणार, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जावेद हे LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकावून संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची वेगळी छबी उभारण्यास मदत करणार आहे. इम्रान यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये आपली छबी सुधारण्यासाठी जावेद यांची मदत घेतल्याचे म्हटले जात आहे.
Web Title: India may not mind if Javed Miandad march to LoC Kashmir border
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.