India vs Australia, 4th Test Day 5 : टीम इंडियानं गॅबा कसोटीत इतिहास घडवताना चार सामन्यांची मालिका २-१अशी जिंकली. टीम इंडियानं सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर चषक ( Border–Gavaskar Trophy) आपल्याकडे ठेवला. २०१७ ( भारत) आणि २०१८-१९ मध्ये भारतानं २-१ अशी मालिका जिंकली होती. २०२०-२१मध्ये मालिका १-१अशी बरोबरीत सोडवून बॉर्डर-गावस्कर चषक स्वतःकडे ठेवला. या १९८८नंतर गॅबा कसोटीत ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभव पत्करावा लागला. या धक्कादायक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी दोन जबरदस्त हादरे बसले.
पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मायदेशात परतला. तेव्हाच ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज कांगारूंकडून टीम इंडियाचा ४-० असा पराभव, हा निकाल लावून मोकळे झाले. पण, अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली युवा ब्रिगेडनं कांगारूंना सळो की पळो करून सोडलं. भारतानं मालिकेत फक्त कमबॅक केले नाही, तर २-१ असा विजय मिळवून दिला.
शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा केल्या. पुजारानं २११ चेंडूंचा सामना करताना ५६ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभनं आक्रमक खेळ करताना १३८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ८९ धावा चोपल्या.
या विजयाबरोबर टीम इंडियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ( ICC World Test Championship) अव्वल स्थान पटकावताना ऑस्ट्रेलियाला थेट तिसऱ्या स्थानी फेकले. भारतानं या विजयानंतर ७१.७ टक्केवारीनुसार हे अव्वल स्थान पटकावले. यासह टीम इंडियानं ICC World Test Championshipचं फायनलचं तिकीट जवळपास पक्कं केलं आहे.