Ravi Shastri tells Team India to pick new T20 captain - मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा १५ वर्षांचा दुष्काळ संपेल अशी आशा होती, परंतु उपांत्य फेरीत इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी संघाला धू धू धुतले. आता BCCI २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागली आहे आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बदलण्याची मागणी केली आहे. इंग्लंडचा संघाच्या पावलावर पाऊल ठेऊन टीम इंडियानेही ट्वेंटी-२० साठी नवा कर्णधार निवडावा, अशी मागणी शास्त्री यांनी केली आहे.
रोहित शर्मा आता ३५ वर्षांचा आहे आणि तो भारताच्या तीनही फॉरमॅटमधील संघाचा कर्णधार आहे, परंतु वर्ल्ड कपमधील अपयशानंतर रोहितकडून ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी काढून घेतली जावी अशी मागणी होतेय. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित, विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिली गेली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेत, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वन डे मालिकेत खेळणार आहे.''ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये नवा कर्णधार निवडण्यात कोणताच धोका नाही, असे मला वाटते. कारण, क्रिकेटचा व्याप एवढा वाढला आहे की, एका खेळाडूला तीनही फॉरमॅटमध्ये सतत खेळत राहणे शक्य नाही. रोहित वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व करतोय. त्यामुळे ट्वेंटी-२०त नवा कर्णधार निवडण्यास काहीच अडचण नाही. जर हार्दिक पांड्याचं नाव पुढे असेल, तर त्याला करायला हवं,''असे शास्त्री म्हणाले.
इंग्लंडने ज्या पद्धतीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रयोग केले, ते पाहून शास्त्री प्रभावीत झाले आहेत. एकाच वेळी वन डे व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नावावर असलेला इंग्लंड हा पहिलाच संघ आहे. ''ते बसले आणि म्हणाले आता बदल करायला हवा. कोणत्या फॉरमॅटमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम देऊ शकतो, याचा शोध घ्यायला हवा आणि त्यासाठी सीनियर्सना बाहेर बसवावे लागेल तरी चालेल.त्यांनी निडर युवा खेळाडूंना संधी दिली. भारतातही असा प्रयोग सहज शक्य आहे. भारताकडे तसे खेळाडूही आहेत आणि न्यूझीलंड दौऱ्यातून त्याची सुरूवात होताना दिसतेय,''असे शास्त्री म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वलमराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"