हॅमिल्टन : सलामीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दिमाखात विजयी सलामी दिलेल्या भारताला गुरुवारी दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मात्र, या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीयांना आपल्या फलंदाजीत मोठी सुधारणा करावी लागेल. हॅमिल्टनची खेळपट्टी फलंदाजीस पोषक असल्याने येथे भारतीय संघ कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करेल.
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत भारताला १-४ असा पराभव पत्करावा लागला. अखेरचा सामना जिंकून भारतीयांनी क्लीन स्वीप टाळला होता. त्यामुळे गुरुवारी विजय मिळवून या मालिका पराभवाचा वचपा काढण्याचाही भारतीयांचा निर्धार असेल. पाकिस्तानविरुद्ध भारताने सहज बाजी मारत दणक्यात सुरुवात केली. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा मार्ग सोपा नसणार. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २७०-२८० च्या आसपास धावा काढल्यानंतर भारतीयांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
युवा सलामीवीर शेफाली वर्माचे अपयश भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने ती लवकरच लयीमध्ये येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. शेफालीने गेल्या सात सामन्यांत केवळ एकदाच अर्धशतक ठोकले आहे. शिवाय कर्णधार मिताली राजही पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरने अर्धशतक झळकावत आपला फॉर्म मिळवला होता. अशा परिस्थितीत सलामीवीर स्मृती मानधनावर पुन्हा एकदा भारताची मुख्य मदार असेल. तसेच, अष्टपैलू दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकार यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. सामन्याला कोणत्याही क्षणी कलाटणी देण्याची तिघींची क्षमता आहे. गोलंदाजीत सातत्याने शानदार कामगिरी करत असलेल्या झूलन गोस्वामीला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळणेही गरजेचे आहे.
भारत : मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रिचा घोष, तानिया भाटिया, स्नेह राणा, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, झूलन गोस्वामी आणि रेणुका सिंग.
न्यूझीलंड : सोफी डेवाइन (कर्णधार), ॲमी सॅटर्थवेट, सूझी बेट्स, मॅडी ग्रीन, ब्रूक हॉलीडे, हेली जेनसन, फ्रान जोनास, जेस केर, एमेलिया केर, फ्रान्सिस मॅके, रोसमेरी मायर, कैटी मार्टिन, जॉर्जिया प्लिमेर, हन्नाह रोव आणि ली ताहुहू.