- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
तिरंगी टी-२० मालिकेतील बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना भारताने सहजपणे जिंकला. या सामन्यात बांगलादेशची फलंदाजी पाहून खूप आश्चर्य वाटले. त्यांची खेळी लक्षवेधी वाटलीच नाही. असे वाटत होते त्यांना कोलंबोहून ढाकाला जाण्यासाठी लवकरात लवकर फ्लाइट पकडायची आहे. त्यांचे ‘शॉट सिलेक्शन’ अत्यंत निराशाजनक आणि खराब होते. विशेष करून तमिम इक्बाल, सौम्य सरकार, महमुद्दुल्लाह हे प्रमुख आणि अनुभवी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांच्या खेळीमध्ये आत्मविश्वास अजिबात दिसून आला नाही. त्याचबरोबर बांगलादेश संघात त्यांचा सर्वात अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याचा समावेश नाही. मात्र, असे असले तरी त्यांचा सध्याचा संघ चांगला आहे. भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला नाही, असेही नाही. जयदेव उनाडकटने अप्रतिम गोलंदाजी केली, शार्दुल ठाकूरने चांगला मारा केला. इतर गोलंदाजांनीही त्यांना चांगली साथ दिली.
एकूणच भारताने चांगला खेळ करत बाजी मारली. या विजयानंतर आता भारताने अधिक लक्षपूर्वक खेळले पाहिजे. कारण बांगलादेशची कामगिरी सुमार होती आणि भारताची कामगिरी त्यातल्या त्यात बरी होती. त्यामुळे यामध्ये त्यांना आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.
खेळाडूंच्या कामगिरीबाबत म्हणायचे झाल्यास गोलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये छाप पाडण्याची संधी अनुभवी रोहित शर्माने गमावली आहे. पुन्हा तो लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याला लवकरच आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करावी लागेल. दुसरीकडे युवा रिषभ पंत यानेही निराश केले आहे. त्याला या सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण ही संधी साधण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीमधील हा एक नाजूक प्रसंग आहे. कारण, सध्या संधी खूप कमी मिळत आहेत आणि इतर खेळाडूही राष्ट्रीय संघात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे मिळालेल्या संधीचा रिषभने पूर्ण फायदा घेतला पाहिजे.
आनंदाची बाब म्हणजे शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सध्या त्याचा धडाका पाहता त्याला रोखणे कठीण होत आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्या त्याच्यासारखा विध्वंसक फलंदाज दुसरा कोणी दिसत नाही. एकूणच भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली आहे, पण तरीही यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
Web Title: India needs to improve
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.