India New T20 Coach, Rahul Dravid on his WAY-OUT? भारतीय संघाला ढाका येथे झालेल्या वन डे सामन्यात बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, आशिया चषक, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अपयश आले. सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला अपयश आल्यानंतर BCCI ने ठोस पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. रोहित शर्माकडून ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद जाण्याची शक्यता असताना आता राहुल द्रविड याच्याकडूनही ट्वेंटी-२० संघाचे मुख्य प्रशिक्षकपद काढून घेण्याची तयारी BCCI ने केली आहे. BCCI च्या मुंबईतील कार्यालयातून मोठी बातमी समोर येतेय. जानेवारीत ट्वेंटी-२० संघासाठीच्या नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करण्यात येणार आहे.
कोणतही कारण देणार नाही! रोहित शर्मानं पराभवाचं कारण सांगताना दिलाय खेळाडूंना इशारा
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघ नवा प्रशिक्षक व नवा कर्णधारांसह मैदानावर उतरणार आहे. हार्दिक पांड्याकडेच ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. आता BCCI च्या अधिकाऱ्याने InsideSport ला दिलेल्या माहितीनुसार ट्वेंटी-२० संघासाठी नवा प्रशिक्षक निवडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राहुल द्रविडच्या खांद्यावर वन डे व कसोटी संघाची जबाबदारी कायम ठेवण्यात येणार आहे आणि ट्वेंटी-२० संघासाठी वेगळा प्रशिक्षक नेमला जाणार आहे.
“आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत. राहुल द्रविड किंवा कोणाच्याही क्षमतेपेक्षा अधिक, व्यग्र वेळापत्रकामुळे येणाऱ्या भाराचे व्यवस्थापन करण्याचा विचार सुरू आहे. ट्वेंटी-२० क्रिकेट हा आता वेगळाच स्पोर्ट्स आहे, त्याचे वेळापत्रक व्यग्र आहे आणि सातत्याने या मालिका होत आहेत. आपणही बदल आत्मसात केला पाहिजे. होय, मी पुष्टी करू शकतो की, भारताला लवकरच नवीन ट्वेंटी-२० कोचिंग सेटअप मिळेल”, असे बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्याने InsideSport ला सांगितले.
''राहुल द्रविड यांच्या जागी कोण, याची चाचपणी अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे कधी होईल याची आम्हाला केव्हा खात्री नाही, परंतु आम्हाला खात्री आहे की भारताला ट्वेंटी-२० सेटअपसाठी नवीन दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. जानेवारीपूर्वी नवीन कर्णधाराची घोषणा होईल आणि त्यानंतर नवीन प्रशिक्षकाचा निवड केली जाऊ शकते, परंतु मी म्हटल्याप्रमाणे काहीही अंतिम नाही”, असेही अधिक तपशील न सांगता त्या अधिकाऱ्याने सांगितले. याआधी रवी शास्त्री आणि हरभजन सिंग यांनीही ट्वेंटी-२० संघासाठी नवा प्रशिक्षक व नवा कर्णधार ही संकल्पना सुचवली होती.
२०२४मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी BCCI ने आतापासूनच सुरू केली आहे. जानेवारी २०२३ मध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत मोठे बदल पाहायला मिळतील. रोहित शर्मा व विराट कोहली यांना ट्वेंटी-२० संघातून विश्रांती दिली जाईल. हार्दिककडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाणे हे निश्चित आहे. रोहित, विराटसह मोहम्मद शमी, आर अश्विन, दिनेश कार्तिक यांनाही यापुढे ट्वेंटी-२० संघात तुमचा विचार केला जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट सांगितले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला लोकेश राहुल मुकण्याची शक्यता आहे, कारण तो अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाह बंधनात अडकणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"