Team India New Test Captain: विराट कोहली ( Virat Kohli) आता कर्णधारपदाच्या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त झाला आहे. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विराट कोहलीकडून BCCIनं वन डे संघाचेही कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पराभवामुळे विराटनं कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसी स्पर्धा जिंकता न आल्यानं त्याच्याकडून ट्वेंटी-२० व वन डे संघाचे नेतृत्व काढून घेतले जाणार असल्याची चर्चा होती, परंतु तत्पूर्वीच विराटनं निर्णय घेतला. बीसीसीआयनं लगेच ही जबाबदारी रोहित शर्मा ( Rohit Sharma) कडे सोपवली. पण, कसोटी संघाचे नेतृत्व कोणाकडे जाईल, याची उत्सुकता आहे. बीसीसीआयनं याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे आणि आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी याची घोषणा होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकानं भारताला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २४ तासांतच विराटनं कसोटी कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधाराचा मान विराटच्या शिरपेचात आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. शिवाय भारतानं कसोटीत अव्वल स्थानापर्यंत झेप घेतली. पण, विराटनं कर्णधारपद सोडलं अन् भारताची कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकादा टीम इंडियाला नंबर वन बनवण्याचे आव्हान नव्या कर्णधाराला पेलावे लागणार आहे.
विराटनंतर भारताचा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, आर अश्विन अशी नावं चर्चेत आली. अनेक माजी खेळाडूंनी आपापलं मत मांडताना ही नावं सुचवली. पण, बीसीसीआयचा निर्णय झाला असून रोहित शर्माच कसोटी संघाचा कर्णधार असणार आहे. ''रोहित शर्माच कसोटी संघाचा नवा कर्णधार असेल, यात शंकाच नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील संघ जाहीर करताना रोहितची उप कर्णधार म्हणून निवड केली होती आणि त्याला कर्णधारपदावर बढती दिली जाणार आहे. लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport ला सांगितले.
रोहित शर्मावरील वर्कलोड आणि त्याच्या तंदुरुस्तीबाबत निवड समितीनं चर्चा केली आहे. त्यामुळे त्याला तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घ्यावी लागेल, असेही सूत्रांनी सांगितले. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिली कसोटी मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळेल. लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांच्याकडे बीसीसीआय भविष्यातील कर्णधार म्हणून पाहत आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी उप कर्णधार कोण असेल ही नवी चर्चा सुरू होणार आहे. रोहित तंदुरुस्तीतून सावरण्यासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला होता आणि तेथे त्यानं बरंच वजन कमी केल्याचे दिसतंय. तो पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त दिसतोय.