भारतीय क्रिकेट संघाच्या निवडसमितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी लवकरच रोहित शर्मा निर्धारित षटकांच्या खेळात भारतीय संघाचं नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. विराट कोहली त्याच्यावरील जबाबदारीचं ओझं कमी करण्यासाठी लवकरच एकदिवसीय आणि टी-२० संघाचं नेतृत्व स्वत:हून रोहित शर्माकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो, असं विधान किरण मोरे यांनी केलं आहे. एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात सलग होणाऱ्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर संघाचे विविध प्रकारासाठी वेगवेगळे कर्णधार असावेत असं मत याआधी किरण मोरे यांच्या आणखी काही माजी क्रिकेटपटू आणि समिक्षकांनी व्यक्त केलं आहे. एका कालावधीनंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघाचं नेतृत्व करणं खूप कठीण होतं. कोहली माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत खेळला आहे आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून खांद्यावरील जबाबदारीचं ओझं थोडं हलकं करण्याचा विचार करू शकतो, असं मोरे यांनी म्हटलं आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर याबाबतचं चित्र अधिक स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.
धोनीचा आदर्शधोनीनं त्याच्यावरील दबाव कमी करण्याच्या उद्देशानं २०१४ साली कसोटी क्रिकेटमधून कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानं स्वत: याची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर सोपवली होती. त्यानंतर धोनी फक्त एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करत होता. त्यानंतर २०१८ साली धोनीनं एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधूनही कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला होता. पुढे २०१९ पर्यंत संघातील एक सर्वसामान्य खेळाडू म्हणून तो खेळला. धोनीनं २०२१९ साली वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला. धोनीनं गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता.
एकदिवसीय सामन्यांच्या विजयात रोहितची कामगिरी चांगलीकोहलीनं आतापर्यंत ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यातील ६५ सामन्यांमध्ये भारताला विजय प्राप्त करता आला आहे. तर २७ सामन्यांमध्ये संघाला पराभावाला सामोरं जाव लागलं. त्याची विजयाची टक्केवारी 70.43 टक्के इतकी राहिली आहे. तर रोहितनं २०१७-१९ या काळात १० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यात आठ सामन्यांमध्ये भारताला विजय प्राप्त करता आला आहे. तर दोन सामने गमावावे लागले आहेत. रोहितच्या विजयाच्या नेतृत्वाखाली विजयाची टक्केवारी ८० टक्के इतकी राहिली आहे.