मुंबई : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ही 2020 साली पाकिस्तानमध्ये खेळवण्याचे ठरवण्यात आले आहे. पण बीसीसीआयने या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने विरोध दर्शवला आहे. पण पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) या गोष्टीवर वेगळाच पवित्रा घेतला आहे. आम्ही भारताच्या परवानगीपेक्षा आशियाई क्रिकेट काऊंसिलच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत. जर आशियाई काऊंसिलने या स्पर्धेच्या यजमानपदाला मान्यता दिली तर हा चषक पाकिस्तानमध्येच खेळवला जाईल, असे पीसीबीने म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका अजूनही खेळवल्या जात नाहीत. पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये खेळण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे, त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास भारताचे खेळाडू तयार नाहीत. त्याचबरोबर त्रयस्थ पाकिस्तानबरोबरची मालिका खेळायला बीसीसीआयने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता आशिया चषक पाकिस्तानमध्ये होणार असेल, तर तिथे भारतीय संघ जाणार नसल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, " पीसीबी जून 2020 पर्यंत भारताच्या निर्णयाची वाट पाहणार आहे. त्यानंतर भारताने खेळायला होकार दिला तर काहीच प्रश्न नाही, पण जर पाकिस्तानमध्ये भारताला खेळायचे नसेल तर समस्या होऊ शकते. कारण भारताच्या निर्णयावर आशियाई काऊंसिल निर्णय घेणार आहे. आशियाई काऊंसिल जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य करावा लागेल."