लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत भारतीय संघ आपल्या वेगवान गोलंदाजांना आळीपाळीने वापर करणार असेल तर पाच सामन्यांच्या मालिकेत विजयाचा दावेदार असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन याने व्यक्त केले आहे.
मागच्या दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा दौरा आगामी २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीद्वारा सुरू होईल.
वॉटसनने 'इंटरनॅशनल मास्टर्स लीग'च्या घोषणेप्रसंगी सांगितले की, भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये ही मालिका जिंकून देण्याची क्षमता आहे. त्यांच्या गोलंदाजीत भेदकता आहे. मात्र, त्यासाठी पाच सामन्यांत गोलंदाजांचा वापर योग्य पद्धतीने करून घ्यावा लागेल.
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे प्रत्येक परिस्थितीत उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची क्षमता A आहे, यात शंका नाही. पण, ऑस्ट्रेलियाच्या काही खेळपट्ट्यांवर त्यांना त्या प्रकारची मदत मिळणार नाही, जी जगातील अन्य खेळपट्टयांवर मिळते. खेळपट्टीची साथ मिळणार नसेल तरी दोघे प्रभावी ठरतील. पण ते किती प्रभावी ठरतील हे आगामी काळ सांगेल.'
भारताला २०१८-१९ आणि २०२०-२१ च्या मालिकेत विजय मिळवून देणारा चेतेश्वर पुजारा याने फलंदाजीत निर्णायक भूमिका बजावली होती. पण, यंदा त्याच्या अनुपस्थितीचा संघावर विपरीत परिणाम होणार नाही, असे वॉटनसचे मत आहे. भारतासाठी शानदार कामगिरी करणारे अनेक अविश्वसनीय फलंदाज मी पाहिले आहेत. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल अचूक खेळून वेगवान धावा काढतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजाला बाद करण्याची तो संधीही देत नाही.
असे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर आक्रमक खेळून गोलंदाजांवर दडपण आणतात तेव्हा ते अधिक प्रभावी ठरतात. सामनादेखील फिरवू शकतात. भारताकडे क्षमतावान फलंदाज आहेतच; पण त्यांच्या खेळात कौशल्यदेखील आहे. भारतीय संघ दडपण आणून ऑस्ट्रेलियाला त्यांच्या धर्तीवर कोंडीत पकडू शकतो. मागच्या वेळी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडला त्यावेळी तो फार चांगला खेळला होता. मागच्या दौऱ्यातील विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावेल यात शंका नाही, असेही वॉटसनने नमूद केले.