ठळक मुद्देऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांनी दुखापतीमुळे माघार घेतलीमोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, बुमराह, रवींद्र जडेजा व हनुमा विहारी ही अशी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी
India vs Australia : सिडनी कसोटीतील ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियाच्या आनंदावर विरझण टाकणारी बातमी समोर आली आहे. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आणि तिसऱ्या कसोटीतील नायक हनुमा विहारी ( Hanuma Vihari) यांच्यापाठोपाठ प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानेही चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण ( abdominal strain) झाल्यामुळे त्यानं माघार घेतल्याचे वृत्त PTIनं BCCIच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिले आहे. तिसऱ्या कसोटीत बुमराह काही काळासाठी पेव्हेलियनमध्ये प्राथमिक उपचारासाठी गेला होता. तिसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजीलाही आला नाही आणि फलंदाजीलाही नाही. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला असून त्याला ४-५ पाठवड्यांची विश्रांती सांगितली आहे. BCCIनं सोमवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यामुळे मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनाही जडेजा मुकणार आहे. मायदेशात परतल्यावर जडेजा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी जाणार आहे. तिसऱ्या कसोटीत हनुमा विहारीच्याही डाव्या पायाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. तरीही वेदनेसह तो मैदानावर शड्डू ठोकून बसला... त्यानं आर अश्विनसह २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला. विहारी १६१ चेंडूंत २३, तर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला. पेव्हेलियनमध्ये परत जात असताना विहारीला होत असलेल्या वेदना सर्वांना जाणवल्या असतील. त्याचेही चौथ्या कसोटीत खेळणे अवघड आहे. १५ जानेवारीपासून चौथी कसोटी ब्रिस्बेन येथे सुरू होणार आहे. BCCIनं विहारीच्या सहभागाविषयी अधिकृत घोषणा केली नसली तरी तो चौथ्या कसोटीत खेळण्याची शक्यता तुरळक आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. प्रत्यक्ष दौऱ्यावर मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल यांच्यानंतर आता बुमराह, रवींद्र जडेजा व हनुमा विहारी ही अशी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका १-१अशा बरोबरीत असताना ब्रिस्बेन कसोटी मालिकेचा निकाल ठरवणारी आहे. पण, भारतीय संघाच्या मानगुटीवर दुखापतीचे भूत बसल्यानं त्यांच्याकडे फार मर्यादित पर्याय आहेत. फॉर्मात असलेला जडेजा आणि आता कुठे फॉर्म गवसलेला विहारी यांच्या माघारीनं टीम इंडियाला मोठा धक्काच बसला आहे. रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांची माघार, टीम इंडियावर दुखापतग्रस्त खेळाडूंचा वाढला भार; चौथ्या कसोटीसाठी लिमिटेड ऑप्शन!