कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार रमीझ राजा यांना दरवर्षी चार देशांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करायची आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि भारताच्या संघांचाही समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मालिकेत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने सहभागी व्हावे, असे राजा यांनी म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट युद्ध सर्वश्रुत आहे. दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात, तेव्हा मैदानावरील रोमांच शिगेला असतो. जगभरातील चाहतेही या क्षणाची वाट पाहत असतात. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. आता दरवर्षी या दोन संघांमधील क्रिकेट सामने पाहता येतील असे संकेत आहेत.
रमीझ राजा यांनी ट्विटरवर लिहिले, ‘नमस्कार मित्रांनो! भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या चार देशांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सुपर सीरिजचा मी प्रस्ताव देईन. ही मालिका चार देशांद्वारे रोटेशन आधारावर आयोजित होईल, त्याचे महसूल मॉडेल वेगळे असेल, ज्यात सर्व सहभागी देश आयसीसीसोबत नफा शेअर करतील.’
संबंध सुधारण्याचा प्रयत्न
राजा यांचा हा प्रस्ताव भारत-पाकिस्तान संबंध पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यातील नफा सर्व संघांसाठी लाभदायी ठरेल. आयसीसीच्या भविष्यातील दौरा कार्यक्रमात (एफटीपी) मात्र अशा प्रकारच्या स्पर्धेसाठी कुठलीही वेळ शिल्लक नाही. भारताने मागील दहा वर्षांपासून तिरंगी आणि चौरंगी मालिका खेळणे बंद केले आहे.