सिलहट : मागच्या दोन सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी देत सहज विजय नोंदविणारा भारतीय संघ आशिया चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. पाकविरुद्ध मात्र सर्वच प्रमुख खेळाडूंना संधी देण्यावर कर्णधार हरमनकौर हिचा भर असेल.
भारताने सर्व तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकविले तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्ध सामना झाल्यानंतर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांना प्रत्येकी एक सामन्यात विश्रांती देण्यात आली. पाक विरुद्ध दोघीही सोबत खेळतील. शेफालीचा आत्मविश्वास सध्या डळमळीत जाणवतो. मलेशियाविरुद्ध ती नैसर्गिक फटकेबाजी करताना दिसली नाही. मानधना आणि हरमन या मात्र मर्यादित षटकात शानदार कामगिरी करीत येथे दाखल झाल्या आहेत. जेमिमा रॉड्रिग्ज हीदेखील फॉर्ममध्ये आहे. दीप्ती शर्मा मोक्याच्या क्षणी धावा काढताना दिसते.
पाकिस्तान संघातील फलंदाजांना मलेशिया आणि बांगला देशविरुद्ध छोट्या लक्ष्यामुळे अधिक संधी मिळाली नाही. थायलंडविरुद्ध मात्र फलंदाज कुचकामी ठरले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनीदेखील नांगी टाकली.
भारत- पाक सामन्याची उत्सुकता नेहमी शिगेला असते. यंदा उभय संघांमध्ये जे पाच सामने झाले त्यात भारताने सहज विजय नोंदविले आहेत. भारताने जुलै महिन्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकचा पराभव केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"