पणजी : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत होणारा सामना हा युद्धापेक्षा कमी नसतो, असे मत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक सामना 16 जूनला मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. सौरव गांगुली आणि गौतम गंभीर यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी बहिष्कार टाकण्याची भूमिका मांडली.
पण, शुक्रवारी गोव्यात झालेल्या एका कार्यक्रमात सेहवागने या विषयावर आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला,'' येथे दोन मुद्यांवर चर्चा केली जात आहे. आपल्याला पाकिस्तानसोबत युद्ध करायचे आहे की नाही ( आणि क्रिकेट खेळायचे आहे की नाही?). देशाच्या हितासाठी जे आवश्यक असेल तेच करायला हवे मग ते क्रिकेट असो वा युद्ध. आपण युद्ध जिंकायलाच पाहिजे. ते गमावता कामा नये. वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे.''
‘गोवा फेस्ट’ या कार्यक्रमासाठी वीरेंद्र सेहवाग गोव्यात आला होता. कार्यक्रमांतर्गत सेहवागची जाहीर मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत सेहवागने आपल्या क्रिकेटबद्दलच्या आठवणींना उजाळा दिल्या. त्याने सर्वच प्रश्नांना जबरदस्त उत्तरे देत षटकार-चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या उत्तरांनी उपस्थित चाहत्यांचे चांगले मनोरंजन झाले. सेहवाग मैदानात जसा खेळत होता तसाच तो प्रश्नांना मागे टाकत होता.
जर्सी नंबरचा किस्सा
जर्सी बनविणाऱ्या कंपनीने ४४ नंबरची जर्सी बनविली होती. त्यावेळी माझ्या जागी साईराज बहुतुलेची निवड होणार होती. त्यामुळे जर्सीवर बहुतुले याचे नाव होते. मात्र माझी भारतीय संघात निवड झाली. ४४ वा नंबर असल्याने तो मी झाकू शकलो नाही. नाव मात्र झाकले. हाच नंबर माझ्या पाठीवर राहिला. त्यानंतर मी खेळत राहिलो. २००५ मध्ये माझा खराब वेळ आला तेव्हा माझ्या आईने मला हा नंबर बदलायला सांगितले. आई थोडी अंधश्रद्धाळू होती. तिच्या सांगण्यावरून मी ४६ वा नंबर घेतला. त्यानेही काही झाले नाही. त्यानंतर अॅस्ट्रोलॉजीचे पुस्तक वाचणाºया माझ्या पत्नीने मला २ नंबर असायला हवा, असा सल्ला दिला. त्यानेही काही झाले नाही. एक मात्र झाले सासू-सुनेचे मात्र वाजले आणि त्यात मी अडकलो. कारण ऐकायचे कुणाचे हा प्रश्न होता. यावर उपाय काढत मी एका सामन्यात ४६ आणि एका सामन्यात २ नंबरची जर्सी घालायचो. त्यानेही काही झाले नाही. मी नंबरसह जर्सी घालणेच बंद केले. यामुळे दोघी खुश झाल्या.
माझ्या मते चार खेळाडू ‘लिजंड’
माझे काही मित्र मला ‘लिजंड’ म्हणून संबोधतात. पण मी त्याला मानत नाही. सचिन तेंडुलकर जर लिजंड असेल तर सचिन-सेहवागमध्ये फरक तरी काय? भारतात सध्या तीन-चार खेळाडू लिजंड वर्गात आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे. इतर ग्रेट खेळाडूंमध्ये मोडतात.
धोनी, सचिनच्या चित्रपटावर..
मी सामन्य कुटुंबातून पुढे आलो आहे. घरी छोटासा टीव्ही होता. घरच्यांना क्रिकेटचे काहीच माहीत नव्हते. मी पहाटे ३ वाजता केवळ क्रिकेट बघण्यासाठी उठायचो. माझी शाळा १०० मीटरवर होती. त्यामुळे मला क्रिकेट खेळायला वेळ मिळायचा. शाळा सुटली की कुठेही क्रिकेट असले की जायचो. त्या काळात खूप कष्ट केले. हे कष्ट आज तुम्हाला दिसत नाहीत. आम्ही केवळ जाहिराती करतो असे लोकांना दिसते. तसे नाही. सुरुवातीच्या काळातील खेळाडंूचे कष्ट दिसत नाहीत. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांनी केलेले कष्ट चित्रपटातून दिसत आहेत, असे सांगत सेहवागने आपल्यावर चित्रपट बनावा, अशी जणू इच्छाच व्यक्त केली.
Web Title: India-Pakistan Match Like War, We Should Win: Virender Sehwag
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.